आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?
“परमेशाचे स्तवन करा. कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे.”—स्तो. १४७:१.
१-३. (क) स्तोत्र १४७ केव्हा लिहिण्यात आलं असावं? (ख) स्तोत्र १४७ चं परीक्षण केल्याने आपण काय शिकू शकतो?
एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं काहीतरी केलं किंवा एखादा चांगला गुण दाखवला, की आपण भरभरून तिची स्तुती करतो. मग, यहोवा देवाची आणखी किती जास्त आपण स्तुती करायला हवी? शेवटी, त्याच्याजवळ असीम सामर्थ्य आहे आणि त्याचं हे सामर्थ्य त्याच्या अद्भुत सृष्टीतून दिसून येतं. तसंच, आपल्यासाठी त्याने त्याच्या स्वतःच्या पुत्राला दिलं. त्यावरून, आपल्यावर त्याचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. या सर्व गोष्टींसाठी आपण नक्कीच त्याची स्तुती केली पाहिजे.
२ स्तोत्र १४७ वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते; ती म्हणजे, ज्या लेखकाने हे स्तोत्र लिहिलं त्याला यहोवाची स्तुती करण्याची मनापासून इच्छा होती. आणि, आपल्यासोबत इतरांनीही देवाची स्तुती करावी असं प्रोत्साहन त्याने दिलं.—स्तोत्र १४७:१, ७, १२ वाचा.
३ स्तोत्र १४७ नेमकं कोणी लिहिलं हे आपल्याला माहीत नाही. पण, यहोवाने इस्राएल लोकांची बाबेलच्या बंदिवासातून सुटका केली आणि ते यरुशलेमला परत आले, त्या काळातला हा लेखक असावा. (स्तो. १४७:२) या स्तोत्रकर्त्याने यहोवाची स्तुती केली, कारण यहोवाच्या लोकांना आपल्या मायदेशात येऊन पुन्हा एकदा त्याची उपासना करणं शक्य झालं होतं. पुढे याच स्तोत्रात, यहोवाची स्तुती करण्याची आणखी कितीतरी कारणं लेखकाने दिली. ती कारणं कोणती होती? आणि, यहोवाची स्तुती करा किंवा “हललुयाह” असं म्हणण्याची कोणती कारणं आज तुमच्याजवळ आहेत?—स्तो. १४७:१, तळटीप.
यहोवा दुःखी असलेल्यांचं सांत्वन करतो
४. कोरेश राजाने इस्राएली लोकांची सुटका केली तेव्हा त्यांना कसं वाटलं असावं, आणि का?
४ इस्राएली लोक बाबेलच्या बंदिवासात असताना त्यांना कसं वाटलं असेल याची कल्पना करा. ज्या लोकांनी त्यांना बंदी बनवून तिथं नेलं होतं ते त्यांची थट्टा करत म्हणाले: “आम्हाला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.” खरंतर, इस्राएली लोकांच्या आनंदाचं सगळ्यात मोठं कारण यरुशलेम शहर होतं. पण, आता त्याचाच नाश करण्यात आला होता. त्यामुळे, यहुद्यांना गाणं गाण्याची मुळीच इच्छा नव्हती. (स्तो. १३७:१-३, ६) ते अतिशय दुःखी होती आणि त्यांना सांत्वनाची नितान्त गरज होती. पण, देवाच्या वचनात भाकीत केल्यानुसार, त्याने आपल्या लोकांची मदत केली. ती कशी? पारसचा राजा कोरेश याने बाबेलवर विजय मिळवला आणि यहोवाबद्दल तो म्हणाला: “स्वर्गीचा देव परमेश्वर याने . . . मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध.” कोरेश राजा इस्राएली लोकांना असंही म्हणाला: “तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल—त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो—त्याने तेथे जावे.” (२ इति. ३६:२३) हे ऐकून, बाबेलमध्ये असलेल्या इस्राएली लोकांना खरंच किती दिलासा मिळाला असेल!
५. आपल्या भावनिक जखमा भरून काढण्याच्या यहोवाच्या सामर्थ्याविषयी स्तोत्रकर्त्याने काय म्हटलं?
५ यहोवाने केवळ इस्राएल राष्ट्राचंच नाही, तर त्या राष्ट्रातल्या प्रत्येक इस्राएली व्यक्तीचं सांत्वन केलं होतं. आजसुद्धा यहोवा हेच करतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाविषयी लिहिलं: “भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.” (स्तो. १४७:३) आपण आजारी असतो किंवा निराश होतो तेव्हा आपण याची खातरी बाळगू शकतो, की यहोवाला आपली काळजी आहे. आपलं सांत्वन करण्यासाठी आणि आपल्या भावनिक जखमा भरून काढण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (स्तो. ३४:१८; यश. ५७:१५) तो आपल्याला बुद्धी आणि बळ देतो आणि त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करू शकतो.—याको. १:५.
६. स्तोत्र १४७:४ मध्ये दिलेल्या शब्दांमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
६ स्तोत्रकर्ता नंतर आकाशाकडे आपलं लक्ष वेधतो. तो म्हणतो, की यहोवा “ताऱ्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.” (स्तो. १४७:४) स्तोत्रकर्त्याला आकाशात तारे तर दिसत होते, पण त्यांची नेमकी संख्या किती आहे याची त्याला कल्पना नव्हती. आज, वैज्ञानिकांना माहीत आहे की आपल्या आकाशगंगेत कोट्यवधी तारे आहेत. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा संपूर्ण विश्वात असतील! आकाशात नेमके किती तारे आहेत हे मानव मोजू शकत नाही; पण, आपल्या सृष्टिकर्त्याला ते सहजशक्य आहे. खरंतर, त्याला प्रत्येक ताऱ्याची इतकी अचूक माहिती आहे, की त्याने त्या प्रत्येकाला एक नावसुद्धा दिलं आहे. (१ करिंथ. १५:४१) कोणता तारा कुठे आहे हे जर देवाला माहीत आहे, तर तो तुम्हालाही व्यक्तिशः ओळखत नसेल का? नक्कीच. तुम्ही कुठे आहात, तुम्हाला नेमकं कसं वाटतं आणि तुम्हाला कशाची गरज आहे हे त्याला नेहमी माहीत असतं.
७, ८. (क) यहोवा आपल्याबद्दल काय समजू शकतो? (ख) यहोवाचा दयाळूपणा दाखवून देणारं एक उदाहरण द्या.
७ आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची यहोवाला जाणीव आहे आणि आपल्याला मदत करण्याचं सामर्थ्यही त्याच्याकडे आहे. (स्तोत्र १४७:५ वाचा.) तुम्हाला कदाचित असं वाटेल, की तुमची समस्या खूप मोठी आहे आणि तुम्ही तिचा सामना करू शकत नाही. पण, यहोवा आपल्या कमतरता समजू शकतो, कारण आपण “केवळ माती आहो हे तो आठवतो.” (स्तो. १०३:१४) अपरिपूर्ण असल्यामुळे आपण वारंवार त्याच त्या चुका करतो आणि त्यांबद्दल आपल्याला अतिशय वाईटसुद्धा वाटतं. एखाद्याला नको ते बोलून गेल्यामुळे, मनात चुकीच्या इच्छा येऊ दिल्यामुळे किंवा एखाद्याचा हेवा केल्यामुळे नंतर आपल्याला किती पस्तावा होतो! यहोवा देवामध्ये कोणत्याही कमतरता नसल्या, तरी आपल्याला नेमकं कसं वाटतं हे तो अचूकपणे समजू शकतो; कारण “त्याची बुद्धी अमर्याद आहे.”—स्तो. १४७:५.
८ एखाद्या समस्येचा सामना करण्यासाठी यहोवाने आपल्या महान सामर्थ्याचा उपयोग करून तुम्हाला कशी मदत केली, याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल. (यश. ४१:१०, १३) कियोको नावाच्या आपल्या एका पायनियर बहिणीला नेमका असाच अनुभव आला. तिला सेवेसाठी एका नवीन ठिकाणी जाण्याची नेमणूक मिळाली होती. त्या ठिकाणी गेल्यावर मात्र ती खूप दुःखी व निराश झाली. मग, यहोवा आपल्या समस्या समजू शकतो याची कियोकोला कशी खातरी पटली? तिच्या नवीन मंडळीत असे अनेक बंधुभगिनी होते ज्यांनी तिच्या भावना समजून घेतल्या. तिला असं वाटलं जणू यहोवा तिला म्हणत आहे: “तू माझ्यासाठी खूप प्रिय आहेस; तू केवळ एक पायनियर आहेस म्हणून नाही, तर तू माझी मुलगी आहेस आणि तू तुझं जीवन मला समर्पित केलं आहेस म्हणून तू माझ्यासाठी प्रिय आहेस. आणि माझी साक्षीदार म्हणून तू जीवनाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे!” तुमच्याबद्दल काय? यहोवाच्या ‘अमर्याद बुद्धीचा’ तुम्हालाही अनुभव आला आहे का?
यहोवा आपल्या गरजा पूर्ण करतो
९, १०. यहोवा प्रामुख्याने आपल्याला कोणती मदत करतो? याचं एक उदाहरण द्या.
९ आपल्या सर्वांनाच अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज आहे. काही वेळा, आपल्याला पुरेसं अन्न मिळेल की नाही अशी चिंता कदाचित आपल्याला वाटत असेल. पण, यहोवाने पृथ्वीची निर्मित अशा प्रकारे केली आहे, की सर्वांना पुरेल इतकं अन्न पृथ्वी उत्पन्न करू शकते. बायबल म्हणतं, की यहोवा “कावळ्यांच्या कावकाव करणाऱ्या पिलांना” त्यांचं अन्नपाणी देतो. (स्तोत्र १४७:८, ९ वाचा.) जर यहोवा कावळ्यांची भूक भागवू शकतो, तर आपल्या भौतिक गरजा तो पूर्ण करू शकणार नाही का?—स्तो. ३७:२५.
१० पण, यहोवा प्रामुख्याने आध्यात्मिक रीत्या आपला सांभाळ करतो आणि ‘सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली त्याची शांती’ आपल्याला देतो. (फिलिप्पै. ४:६, ७) या गोष्टीचा, मुट्सुओ आणि त्यांची पत्नी यांना अनुभव आला. २०११ मध्ये जपानला त्सुनामीचा जबरदस्त तडाखा बसला तेव्हा ते आपल्या घराच्या छतावर चढून गेले आणि त्यामुळे त्या त्सुनामीतून मरता मरता वाचले. त्या दिवशी, ते जवळजवळ आपलं सगळं काही गमावून बसले. ती रात्र, त्यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका थंड व अंधाऱ्या खोलीत काढली. मग सकाळ झाली तेव्हा आपल्याला धीर मिळेल असं काहीतरी शोधत असताना एकच गोष्ट त्यांना सापडली. ती म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांचं २००६ चं इयरबूक. त्यातली पानं चाळत असताना मुट्सुओ यांचं लक्ष एका शीर्षकाकडे गेलं. ते शीर्षक होतं: “आजवर होऊन गेलेल्या सगळ्यात भयानक त्सुनामी.” त्याखाली, २००४ साली सुमात्रा इथे सगळ्यात विनाशकारी त्सुनामी घडवून आणणाऱ्या भूकंपाची माहिती दिली होती. त्यात आपल्या बंधुभगिनींचे अनुभव वाचून मुट्सुओ आणि त्यांची पत्नी यांना अश्रू आवरले नाहीत. त्यांना जाणवलं, की त्यांना ज्या गोष्टीची गरज होती नेमकी तीच गोष्ट यहोवा त्यांना देत होता. यहोवाने इतर मार्गांनीही त्यांची काळजी घेतली. जपानच्या इतर भागांतल्या बांधवांनी त्यांना अन्नपाणी आणि कपडे पुरवले. तसंच, देवाच्या संघटनेने मंडळ्यांना भेटी देण्यासाठी काही बांधवांना पाठवलं होतं. या बांधवांनी दिलेल्या भेटींमुळे त्यांना सगळ्यात जास्त धीर मिळाला. मुट्सुओ म्हणतात: “मला असं वाटलं, जणू यहोवा आमच्यापैकी प्रत्येकाच्या अगदी जवळ आहे आणि तो आमची काळजी घेत आहे. किती दिलासा देणारं होतं ते!” खरोखर, यहोवा आधी आध्यात्मिक रीतीने आपला सांभाळ करतो आणि मग आपल्या भौतिक गरजाही तो पूर्ण करतो.
यहोवाच्या मदतीचा लाभ घ्या
११. यहोवाच्या मदतीचा लाभ घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
११ यहोवा “लीनांना [नम्र जनांना] आधार देतो.” त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपल्याला मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (स्तो. १४७:६क) यहोवाच्या या मदतीचा लाभ घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ असला पाहिजे. तसंच, आपण नम्र असणंही खूप गरजेचं आहे. (सफ. २:३) स्वतःवर झालेला अन्याय आणि दुःख दूर करण्यासाठी नम्र लोक नेहमी यहोवावर विसंबून राहतात. अशा नम्र लोकांवर यहोवाची कृपापसंती असते.
१२, १३. (क) यहोवाच्या मदतीचा लाभ घेण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? (ख) यहोवा कोणत्या लोकांवर संतुष्ट होतो?
स्तो. १४७:६ख) आपल्या बाबतीत असं काही घडावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. याउलट, यहोवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्यावर कायम असावं अशीच आपली इच्छा आहे. आणि त्यासाठी यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टींचा आपण द्वेष केला पाहिजे. (स्तो. ९७:१०) उदाहरणार्थ, आपण अनैतिक लैंगिक कृत्यांचा द्वेष केला पाहिजे. याचा अर्थ, अनैतिक कृत्य करण्यास उत्तेजन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून, अगदी पोर्नोग्राफीपासूनही (अश्लील साहित्यापासून) आपण दूर राहिलं पाहिजे. (स्तो. ११९:३७; मत्त. ५:२८) यासाठी कदाचित आपल्याला खूप संघर्ष करावा लागेल. पण, आपण जो काही संघर्ष करू तो मुळीच व्यर्थ ठरणार नाही; कारण त्यामुळे आपल्याला यहोवाचे आशीर्वाद मिळतील.
१२ दुसरीकडे पाहता, यहोवा “दुर्जनांना धुळीस मिळवतो.” (१३ अर्थात, हा संघर्ष आपण स्वतःच्या बळावर करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला यहोवावर विसंबून राहण्याची गरज आहे. मानव मदतीसाठी सहसा ज्या गोष्टींवर विसंबून राहतात त्यांवर आपण विसंबून राहिलो तर यहोवाला आनंद होईल का? मुळीच नाही. बायबल म्हणतं, की यहोवा “घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही.” मग, आपण स्वतःच्या बळावर किंवा इतर लोकांवर विसंबून राहावं का? बायबल म्हणतं, की यहोवा “मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही.” (स्तो. १४७:१०) त्यामुळे, स्वतःवर किंवा इतरांवर विसंबून राहण्याऐवजी, आपण सतत यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या कमतरतांवर मात करता यावी म्हणून त्याला मदतीची याचना केली पाहिजे. अशा प्रार्थनांचा यहोवाला कधीच कंटाळा येत नाही. उलट, “जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.” (स्तो. १४७:११) यहोवाचं आपल्यावर एकनिष्ठ प्रेम असल्यामुळे, चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी तो आपल्याला मदत करत राहील याची आपल्याला खातरी आहे.
१४. स्तोत्रकर्त्याला कशाची खातरी होती?
१४ समस्या येतात तेव्हा आपल्याला मदत करण्याचं आश्वासन यहोवा देतो. इस्राएली लोक यरुशलेममध्ये परत आले तेव्हा यहोवाने कशा प्रकारे त्यांची मदत केली यावर स्तोत्रकर्त्याने मनन केलं. तो आपल्या स्तोत्रात म्हणाला: “त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो.” (स्तो. १४७:१३, १४) यहोवा शहराच्या वेशी किंवा दरवाजे मजबूत करेल हे जाणून स्तोत्रकर्त्याला खरंच किती सुरक्षित वाटलं असेल! कारण, यामुळे त्याला हे आश्वासन मिळालं, की यहोवा नक्कीच आपल्या लोकांचं रक्षण करेल.
१५-१७. (क) काही वेळा आपल्यावर आलेल्या परीक्षांबद्दल आपल्याला कसं वाटू शकतं, पण यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला कशी मदत करतो? (ख) आपल्याला मदत करण्यासाठी यहोवाचा “शब्द फार वेगाने धावतो,” याचं एक उदाहरण द्या.
१५ काही वेळा, तुमच्या समस्यांमुळे तुम्ही अतिशय चिंतित व्हाल. पण, समस्यांचा सामना करण्यासाठी यहोवा तुम्हाला बुद्धी देऊ शकतो. स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की देव “आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.” पुढे तो हिम, दव आणि बर्फाचा चुरा (गारा) यांचा उल्लेख केल्यावर म्हणतो: “त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? त्यानंतर स्तोत्रकर्ता म्हणतो, की यहोवा “आपला हुकूम पाठवून ते वितळवितो; तो आपला वारा वाहवितो तेव्हा पाणी वाहू लागते.” (स्तो. १४७:१५-१८) जो देव गारा आणि हिम यांच्यावरसुद्धा नियंत्रण ठेवतो, तो बुद्धिमान व शक्तिशाली देव तुम्हाला कोणत्याही समस्येवर मात करण्यास मदत करणार नाही का?
१६ आज यहोवा त्याच्या वचनाद्वारे, बायबलद्वारे आपलं मार्गदर्शन करतो. स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की आपली मदत करण्यासाठी यहोवाचा “शब्द फार वेगाने धावतो.” यहोवा अगदी योग्य वेळी आपल्याला मार्गदर्शन देतो. बायबलमधून, तसंच ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाकडून’ मिळणारी प्रकाशनं, JW ब्रॉडकास्टिंग, jw.org वेबसाईट, मंडळीतले वडील आणि तुमचे बंधुभगिनी या सर्वांपासून तुम्हाला कसा लाभ होतो याचा विचार करा. (मत्त. २४:४५) तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी यहोवा किती वेगाने धावून आला, हे तुम्ही स्वतः अनुभवलं आहे का?
१७ सिमोना नावाच्या आपल्या एका बहिणीने देवाच्या वचनातून मिळणाऱ्या मदतीचा अनुभव घेतला. तिच्यामध्ये कमीपणाची भावना होती आणि यहोवा
आपल्यावर संतुष्ट नाही असं तिला वाटायचं. पण ती निराश व्हायची तेव्हा नेहमी यहोवाला प्रार्थना करायची आणि मदतीसाठी त्याला याचना करायची. त्यासोबतच, ती बायबलचा अभ्यासही करत राहिली. सिमोना म्हणते: “माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक परिस्थितीत यहोवाने मला कसं बळ दिलं आणि माझं मार्गदर्शन केलं हे मी स्वतः अनुभवल आहे.” या गोष्टीमुळे, तिला जीवनात एक सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत मिळाली.१८. यहोवा तुमच्या अगदी जवळ आहे असं तुम्हाला का वाटतं, आणि त्याची स्तुती करण्याची कोणती कारणं तुमच्याकडे आहेत?
१८ स्तोत्रकर्त्याला माहीत होतं, की यहोवाने पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमधून प्राचीन इस्राएल राष्ट्राला आपलं राष्ट्र म्हणून निवडलं आहे. केवळ हेच एक असं राष्ट्र होतं ज्याला देवाचं “वचन” आणि “नियम” देण्यात आले होते. (स्तोत्र १४७:१९, २० वाचा.) आज आपल्यालाही देवाच्या नावाने ओळखले जाण्याचा बहुमान लाभला आहे. आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे, आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याजवळ त्याचं वचन आहे आणि त्याच्यासोबत आपण एक घनिष्ठ नातेसंबंध जोडू शकतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! खरंच, स्तोत्र १४७ च्या लेखकाप्रमाणेच यहोवाची स्तुती करण्याची आणि इतरांनाही तसं करण्याचं प्रोत्साहन देण्याची कितीतरी कारणं आज आपल्याकडे आहेत.