व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

वर्षं आणि महिने कधी सुरू होतात हे बायबल काळात लोकांना कसं समजायचं?

इस्राएलमध्ये नांगरणी आणि पेरणी केली जायची तेव्हा वर्षाची सुरवात व्हायची. ज्याला आज आपण सप्टेंबर/ऑक्टोबर म्हणतो.

यहुदी लोक वर्षांची लांबी सूर्याच्या अनुसार ठरवायचे. आणि महिन्यांची लांबी ते चंद्रभ्रमणाच्या आधारावर ठरवायचे. हा काळ २९ ते ३० दिवसांचा असायचा. पण चंद्राच्या भ्रमणावर आधारित असलेल्या वर्षात, सूर्याच्या अनुसार असलेल्या वर्षापेक्षा थोडे कमी दिवस असायचे. आणि हा फरक भरून काढायच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. एकतर वर्षाच्या शेवटच्या महिन्याला ते जास्तीचे दिवस जोडून वर्ष पूर्ण करायचे. किंवा मग दोन-तीन वर्षांनंतर एक जास्तीचा महिना जोडून ते वर्ष पूर्ण करायचे. असं केल्यामुळे वर्षातले वेगवेगळे महिने पिकांची पेरणी आणि कापणी करायच्या ऋतूंशी जुळायचे.

मोशेच्या काळात देवाने त्याच्या लोकांना सांगितलं होतं, की धार्मिक कार्यांच्या संदर्भात त्यांच्या वर्षाची सुरवात अबीब किंवा निसान महिन्याने होईल. हा महिना वसंत ऋतूत, म्हणजे आपल्या कॅलेंडरप्रमाणे मार्च-एप्रिलच्या दरम्यान असायचा. (निर्ग. १२:२; १३:४) या महिन्यात एक सण साजरा केला जायचा आणि तो जवाच्या कापणीच्या काळात असायचा.​—निर्ग. २३:१५, १६.

एमिल शूरर या विद्वानाने त्याच्या पुस्तकात * असं म्हटलं, की “यहुदी लोक निसान महिन्यात (१४ तारखेला) वल्हांडण सण साजरा करायचे. हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा करणं आवश्‍यक होतं. वसंत ऋतूत एक असा दिवस असायचा जेव्हा दिवस आणि रात्र १२-१२ तासांच्या लांबीची असायची. वल्हांडणाचा सण नेहमी याच्या दुसऱ्‍या दिवशी साजरा करायचा होता. जर एखाद्या वर्षी सणाची तारीख या दिवसाच्या आधीच आली, तर यहुदी लोक त्या वर्षाच्या शेवटी आणि निसान महिन्याच्या आधी एक तेरावा महिना जोडायचे. वर्षाच्या शेवटी जास्तीचा महिना जोडायचा की नाही हे या सगळ्या गोष्टींच्या आधारावर ठरायचं.”

स्मारकविधीची तारीख निश्‍चित करताना यहोवाचे साक्षीदार हा नियम लक्षात घेतात. स्मारकविधी वसंत ऋतूत म्हणजे यहुदी कॅलेंडरप्रमाणे निसान १४ तारखेशी जुळणाऱ्‍या दिवशी साजरा केला जातो. जगभरातल्या मंडळ्यांना ही तारीख आधीच कळवली जाते. *

पण एखादा महिना कधी संपतो आणि पुढचा महिना कधी सुरू होतो हे यहुद्यांना कसं कळायचं? आज आपण यासाठी आपल्या कॅलेंडरचा किंवा मोबाईलचा वापर करतो. पण त्या काळात हे इतकं साधंसोपं नव्हतं.

नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा प्रत्येक महिना ३० दिवसांचा धरला जायचा. (उत्प. ७:११, २४; ८:३, ४) पण पुढे यहुद्यांच्या कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक महिन्यात ३० दिवस असतीलच असं नव्हतं. त्यांच्या कॅलेंडरप्रमाणे पहिली चंद्रकोर दिसल्यावर, म्हणजे आधीचा महिना सुरू झाल्यावर साधारण २९ किंवा ३० दिवसांनी नवीन महिना सुरू व्हायचा.

एकदा दावीद आणि योनाथान या दोघांनी एका महिन्याबद्दल बोलताना “उद्या नवचंद्राचा दिवस आहे,” असं म्हटलं. (१ शमु. २०:५, १८) यावरून दिसून येतं, की त्यांच्या काळात महिने कधी सुरू होतील हे आधीपासूनच मोजून ठेवलं जायचं. मग एखाद्या यहुदी व्यक्‍तीला महिना कधी सुरू होणार आहे, हे कसं कळायचं? याबद्दल आपल्याला मिश्‍नामध्ये (यहुदी लोकांच्या मौखिक नियमांचा आणि परंपरांचा ग्रंथ) थोडी माहिती मिळते. या ग्रंथानुसार सन्हेद्रिन (यहुद्यांचं उच्च न्यायालय) या यहुदी लोकांच्या न्यायसभेद्वारे हे ठरवलं जायचं. ज्या सात महिन्यांदरम्यान सण साजरे केले जायचे त्या काळात प्रत्येक महिन्याच्या ३० व्या दिवशी ही न्यायसभा भरवली जायची आणि पुढचा महिना कधी सुरू होणार आहे हे ठरवायची जबाबदारी त्यांची होती. ते हे कसं ठरवायचे?

यरुशलेम शहराच्या आसपास काही माणसांना उंच डोंगरांवर आणि उंच ठिकाणांवर नियुक्‍त केलं जायचं. त्यांच्यापैकी एखाद्याला आकाशात पहिली चंद्रकोर दिसताच तो लगेच न्यायसभेला याची सूचना द्यायचा. मग आणखी काही जणांकडून याची खातरी पटल्यावर न्यायसभा नवीन महिना सुरू झाल्याची घोषणा करायचे. पण जर ढगाळ वातावरणामुळे किंवा धुक्यामुळे चंद्रकोर दिसली नाही तर न्यायसभा अशी घोषणा करायची की चालू महिन्यात ३० दिवस आहेत आणि उद्यापासून नवीन महिना सुरू होईल.

मिश्‍नामध्ये असंही म्हटलं आहे, की न्यायसभेचा निर्णय लोकांना कळावा म्हणून यरुशलेमजवळ असलेल्या जैतुनांच्या डोंगरावर आग जाळून संकेत दिला जायचा. इस्राएलमध्ये इतर उंच ठिकाणीही अशीच आग जाळून लोकांना हे कळवलं जायचं. हे कळवण्यासाठी पुढे काही निरोप्यांनाही पाठवलं जाऊ लागलं. अशा रितीने यरुशलेम आणि संपूर्ण इस्राएलमध्ये, तसंच दूरच्या ठिकाणी राहणाऱ्‍या यहुद्यांनाही नवीन महिना कधी सुरू होतोय हे कळायचं. त्यामुळे सगळे जण एकाच वेळी सण साजरे करू शकायचे.

सोबत दिलेल्या चार्टमधून यहुदी कॅलेंडरमधले महिने, सण आणि ऋतू एकमेकांशी कसं संबंधित होते ते समजायला तुम्हाला मदत होईल.

^ द हिस्ट्री ऑफ जुईश पिपल इन द एज ऑफ जिसस क्राईस्ट (इ.स.पू. १७५-इ.स. १३५)

^ १५ फेब्रुवारी १९९० च्या टेहळणी बुरूज अंकात पान १५ वर दिलेली माहिती आणि १५ जून १९७७ च्या टेहळणी बुरूज अंकाच्या इंग्रजी मासिकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.