४ | बायबलमधले व्यावहारिक सल्ले
बायबल म्हणतं: ‘संपूर्ण शास्त्र उपयोगी आहे.’—२ तीमथ्य ३:१६.
याचा काय अर्थ होतो?
बायबल हे उपचारांबद्दल माहिती देणारं पुस्तक नसलं, तरी त्यात काही व्यावहारिक सल्ले आहेत आणि त्यांमुळे बराच फायदा होऊ शकतो. मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तीलाही या सल्ल्यांमुळे फायदा होऊ शकतो. काही उदाहरणं पाहा.
यामुळे कशी मदत होऊ शकते?
“वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.”—मत्तय ९:१२.
आपल्याला वैद्यकीय उपचाराची गरज पडू शकते, हे बायबलसुद्धा मान्य करतं. योग्य माहिती घेतल्यामुळे आणि डॉक्टरांकडून उपचार घेतल्यामुळे बऱ्याच जणांना मानसिक आजाराला तोंड द्यायला मदत झाली आहे.
‘शारीरिक व्यायाम उपयोगी आहे.’—१ तीमथ्य ४:८.
आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या आणि त्यासाठी थोडा वेळ काढला आणि मेहनत घेतली, तर आपलं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहील. जसं की नियमित व्यायाम करणं, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप घेणं यांसारख्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावू शकतो.
“आनंदी मन हे उत्तम औषध आहे, पण दुःखी मनामुळे शरीरात जोम राहत नाही.”—नीतिवचनं १७:२२.
प्रोत्साहन मिळेल असे बायबल अहवाल वाचले आणि गाठता येतील अशी ध्येयं ठेवली, तर आपल्याला आनंदी राहायला मदत होईल. मानसिक आजाराचा सामना करत असताना
आपण जर परिस्थितीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि चांगल्या गोष्टींची आशा ठेवली, तर भावनांवर संतुलन ठेवायला आपल्याला मदत होऊ शकते.“जे आपल्या मर्यादांची जाणीव ठेवतात, त्यांच्याकडे बुद्धी असते.”—नीतिवचनं ११:२.
सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःहून करता आल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल. पण मानसिक आजारामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी जमत नसतील. अशा वेळी इतरांची मदत घ्यायला कचरू नका. तुमच्या मित्रांना किंवा घरच्या लोकांना तुम्हाला मदत करावीशी वाटत असेल, पण नेमकं काय करायचं ते त्यांना समजत नसेल. तेव्हा खासकरून काय केल्यामुळे तुम्हाला मदत होईल हे त्यांना सांगा. शिवाय, त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा करू नका आणि ते जी काही मदत करतात त्याबद्दल त्यांचे आभार माना.
बायबलचा सल्ला मानल्यामुळे मानसिक आजार असलेल्यांना कशी मदत होत आहे?
“मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मला तपासलं आणि मला मानसिक आजार असल्याचं कळलं. त्यामुळे जे समोर आहे त्याला तोंड द्यायला मी तयार झाले आणि उपचाराचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत तेही मला कळलं.”—बायपोलर डिसऑर्डर हा मानसिक आजार असणारी निकोल. a
“मला असं जाणवलंय, की दररोज सकाळी जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत बायबल वाचतो तेव्हा माझा दिवस चांगला जातो, मनात चांगले विचार राहतात. आणि जेव्हा मला जास्त त्रास होतो तेव्हा वाचलेल्या एखाद्या वचनामुळे माझ्या मनाला शांती मिळते.”—अतिनैराश्याचा (डिप्रेशनचा) सामना करणारा पिटर.
“माझ्या आजाराबद्दल इतरांना सांगायला मला खूप लाज वाटायची. पण माझी एक जवळची मैत्रीण होती. ती माझं लक्ष देऊन ऐकायची आणि मला समजून घ्यायचा प्रयत्न करायची. तिच्याशी बोलून मला बरं वाटायचं आणि एकटेपणाही जाणवायचा नाही.”—खाण्याच्या विकृतीचा (ईटिंग डिसऑर्डरचा) सामना करणारी जीयू.
“फक्त काम करणंच महत्त्वाचं नाही तर त्यासोबत पुरेशी विश्रांती घेणंसुद्धा गरजेचं आहे, हे समजून घ्यायला मला बायबलमुळे मदत झाली. त्यात दिलेला सुज्ञ सल्ला लागू केल्यामुळे मला भावनिक समस्यांचा सामना करायला मदत झाली आहे.”—ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डरचा सामना करणारा तिमथी.
a काही नावं बदलण्यात आली आहेत.