मुख्य विषय | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो
शोक करत राहणं चुकीचं आहे का?
तुम्हाला कधी लहान-सहान आजार झाला होता का? कदाचित तुम्ही त्या आजारातून इतक्या लवकर बाहेर पडलात की तुम्हाला त्याबद्दल आठवणदेखील नसेल. पण आपल्या प्रिय जनांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखाचं तसं नसतं. डॉक्टर एलन वुलफेल्ट, आपल्या हिलींग अ स्पाउस्ज ग्रीवींग हार्ट या पुस्तकात म्हणतात “प्रिय जनांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखातून तुम्हाला पूर्णपणे ‘बाहेर पडणं’ कधीच शक्य होणार नाही. पण काळाच्या ओघात आणि दुसऱ्यांच्या मदतीनं तुमचं दु:ख जरूर कमी होऊ शकतं.”
बायबलमधील काही उदाहरणं पाहू या. कुलपिता अब्राहाम याच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा त्याची काय अवस्था झाली. बायबलच्या मूळ लिखाणात असं म्हटलं आहे की अब्राहामाने आपली पत्नी सारा हिच्यासाठी शोक आणि विलाप करायला सुरुवात केली. “सुरुवात केली” या शब्दांवरून आपल्याला कळतं की त्याचं दुःख काही क्षणांपुरतं नव्हतं तर त्या दुःखातून सावरायला त्याला काही वेळ लागला. * बायबलमधील आणखी एक व्यक्ती, याकोब यानेदेखील अशाच परिस्थितीचा सामना केला. त्याला असं खोटं सांगण्यात आलं की त्याचा मुलगा योसेफ याला जंगली प्राण्यानं मारून टाकलं. त्यामुळे तो अनेक दिवस दुःख करत राहिला आणि त्याच्या कुटुंबातील लोक त्याचे सांत्वन करू शकले नाही. अनेक वर्षांनंतर देखील तो योसेफच्या मृत्यूचं दुःख तो विसरू शकला नव्हता.—उत्पत्ति २३:२; ३७:३४, ३५; ४२:३६; ४५:२८.
आज ज्यांच्या प्रिय जनांचा मृत्यू होतो त्यांच्याबाबतीत देखील हीच गोष्ट खरी आहे. याची आपण दोन उदाहरणं पाहू या.
-
६० वर्षांच्या गेल म्हणतात, “माझे पती रॉबर्ट ९ जुलै, २००८ ला वारले. ज्या दिवशी त्यांचा अपघात झाला तो दिवस नेहमी सारखाच होता.” सकाळचा नाश्ता झाल्यावर तिचे पती कामाला जाताना, रोजच्या सारखं त्यादिवशीही त्यांनी एकमेकांना मिठीत घेऊन ‘आय लव्ह यू’ म्हटलं. त्या पुढे म्हणतात, “आज त्यांना जाऊन सहा वर्षं झाली आहेत, पण ते दुःख अजून माझ्या मनात घर करून आहे. मला माझ्या जीवनात रॉबची उणीव कायम भासत राहील.”
-
८४ वर्षांचे एटियन म्हणतात, “माझ्या प्रिय पत्नीला जाऊन आज १८ वर्षं जरी झाली असली, तरी मला तिची आठवण रोज येते. माझ्या आयुष्यात तिची पोकळी निर्माण झाली आहे. मी जेव्हा कधी निसर्गरम्य दृश्य पाहतो तेव्हा मला लगेच तिची आठवण येते आणि मी विचार करू लागतो की तिलाही हे दृश्य पाहून किती आनंद झाला असता.”
मनातील दुःख, त्या न विसरता येणाऱ्या आठवणी, बऱ्याच काळापर्यंत राहणं साहजिकच आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीनं या दुःखाचा सामना करत असते आणि तिला सावरायला बराच काळ लागू शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने या दुःखातून लगेच सावरावं अशी तिच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं ठरू शकतं. त्या प्रमाणेच जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही अशा दुःखातून सावरायला वेळ लागत असेल तर तुम्ही स्वतःला त्यासाठी दोष देत राहू नका. पण मग प्रश्न येतो, आपण या दुःखातून कसं सावरू शकतो? (wp16-E No. 3)
^ परि. 4 अब्राहामाचा मुलगा इसहाक यालादेखील बरीच वर्षं अशाच दुःखाचा सामना करावा लागला. त्याने त्याच्या आईला गमावलं होतं. तिच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही तो तिच्यासाठी दुःख करत होता.—उत्पत्ति २४:६७.