व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक बुद्धिमान स्त्री आपल्या विवेकाचा आदर करते

बायबल काय म्हणतं?

गर्भपात

गर्भपात

दर वर्षी लाखो जन्म न झालेल्या बाळांचा जाणूनबुजून गर्भपात करण्यात येतो—ही संख्या कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.

वैयक्तिक निवड की नैतिक प्रश्न?

लोक काय म्हणतात?

 

ज्या स्त्रिया गर्भपात करतात त्यामागे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. जसं की, आर्थिक अडचणी, नातेसंबंधांमधल्या समस्या, उच्च शिक्षण, करियर किंवा त्या एकट्या पालक म्हणून मुलांची जबाबदारी घ्यायला तयार नसतात. पण इतर असेही आहेत ज्यांच्या मते गर्भपात नैतिक दृष्टीने चुकीचा आहे. कारण एका गर्भवती स्त्रीवर न जन्मलेल्या मुलाचा सांभाळ करण्याची, त्याचं संरक्षण करण्याची आणि त्याला जन्म देण्याची नैतिक जबाबदारी असते. गर्भपात करून एक स्त्री, देवाने तिच्यावर टाकलेला हा भरवसा तोडते.

बायबल काय म्हणतं?

 

देवाच्या नजरेत जीवन आणि खासकरून मानवी जीवन मौल्यवान आहे. (उत्पत्ति ९:६; स्तोत्र ३६:९) हे तत्त्व गर्भात वाढणाऱ्या बाळालादेखील लागू होतं कारण बाळाला सुरक्षित वाढण्यासाठी देवाने गर्भाची रचना केली. एका बायबल लेखकाने म्हटलं, “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली.” तो पुढे म्हणतो: “मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.”—स्तोत्र १३९:१३, १६.

जन्म न झालेल्या बाळाबद्दल देवाचा दृष्टिकोन, त्याने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रावरून आणि त्याने आपल्याला दिलेल्या विवेकावरून दिसून येतो. नियमशास्त्रात असं म्हटलं होतं की, जर एका व्यक्तीने एका गरोदर स्त्रीला मारहाण केली आणि त्यामुळे तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी. त्या व्यक्तीने घेतलेल्या जिवाची भरपाई त्याला आपल्या जिवाने करायची होती. (निर्गम २१:२२, २३) असं असलं तरी, न्याय करणाऱ्यांना शिक्षा देण्याआधी, त्या व्यक्तीचा हेतू आणि परिस्थिती लक्षात घ्यायची होती.—गणना ३५:२२-२४, ३१.

मानवांकडे विवेकदेखील आहे. जेव्हा एक स्त्री तिच्या विवेकानुसार वागते म्हणजे तिचा आतला आवाज ऐकते आणि आपल्या न जन्मलेल्या बाळाच्या जीवनाचा आदर करते तेव्हा तिचा विवेक तिला आशीर्वाद देतो. * पण जर तिने या विवेकाचं ऐकलं नाही तर तो तिला त्रास देत राहतो, इतकंच नाही तर दोषही देत राहतो. (रोमकर २:१४, १५) काही संशोधनात असं दिसून आलं आहे की, ज्या स्त्रिया गर्भपात करतात त्यांना चिंता आणि नैराश्य येण्याची जास्त शक्यता असते.

जर एखाद्या जोडप्याने कुटुंब नियोजन केलं नसेल आणि बाळाला मोठं करण्याची जबाबदारी त्यांना कठीण वाटत असेल तर गर्भपात करणं योग्य ठरेल का? जे देवाच्या स्तरांनुसार जीवन जगतात, त्यांच्यासाठी असं अभिवचन दिलं आहे: “जर एखादा माणूस [किंवा स्त्री] तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.” (स्तोत्र १८:२५, ईझी-टू-रीड-व्हर्शन) देवाच्या वचनात असंही म्हटलं आहे: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस सोडत नाही.”—स्तोत्र ३७:२८.

“त्यांचा विवेकही साक्ष देतो आणि त्यांचे स्वतःचेच विचार त्यांना दोषी अथवा निर्दोष ठरवतात.”रोमकर २:१५.

तुम्ही गर्भपात केला असेल तर?

लोक काय म्हणतात?

 

आपल्या मुलांचा एकट्यानेच सांभाळ करणारी आई, रूथ * म्हणते: “मला आधीच तीन मुलं होती आणि मी चौथ्याची काळजी घेऊ शकणार नाही असं मला वाटलं. पण गर्भपात करून मी काहीतरी भयंकर केलं आहे असं मला वाटू लागलं.” पण देव तिला कधीच क्षमा करणार अशी चूक तिने केली होती का?

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

 

येशू देवाचे विचार प्रकट करत बोलला: “मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.” (लूक ५:३२) हो, हे खरं आहे की, जेव्हा आपल्या चुकीबद्दल आपल्याला मनापासून पश्‍चात्ताप होतो आणि आपण देवाकडे क्षमा मागतो, तेव्हा तो आपल्या गंभीर पापांसाठी देखील आपल्याला क्षमा करतो. (यशया १:१८) तसंच, स्तोत्र ५१:१७ मध्ये म्हटलं आहे की, देव पश्‍चात्तापी आणि खचलेल्या मनाच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणार नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती नम्रतेने आणि शुद्ध विवेकाने प्रार्थना करते, तेव्हा देव अशा पश्‍चात्तापी व्यक्तीला मनःशांती देतो. “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखेल,” असं फिलिप्पैकर ४:६, ७ * मध्ये म्हटलं आहे. बायबलचं वाचन केल्यामुळे आणि देवापुढे मन मोकळं केल्यामुळे रूथला खरी शांती अनुभवायला मिळाली. यामुळे तिला हे कळलं की देवाच्या “ठायी क्षमा आहे.”—स्तोत्र १३०:४.

“आमच्या पातकांच्या मानाने त्याने [देवाने] आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही.”स्तोत्र १०३:१०.

^ परि. 10 आईला किंवा बाळाला पुढे जाऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता जरी असली, तरी गर्भपात करणं योग्य ठरणार नाही. जर बाळाच्या जन्माच्यावेळी, आई किंवा मूल यांपैकी कोणा एकाचाच जीव वाचणार असेल, तर कोणता निर्णय घ्यायचा, हे त्या जोडप्यालाच ठरवावं लागेल. असं असलं तरी, बऱ्याच देशात वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की अशी परिस्थिती फार कमी वेळा निर्माण होते.

^ परि. 15 नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 18 पुनरुत्थानाच्या आशेमुळेही एका व्यक्तीला मनःशांती मिळू शकते. १५ एप्रिल २००९ टेहळणी बुरूज अंकातले “वाचकांचे प्रश्न” पाहा. यामध्ये न जन्मलेल्या बाळाच्या पुनरुत्थानाबद्दल बायबल तत्त्वांवर चर्चा करण्यात आली आहे.