आपला आध्यात्मिक वारसा
“हाच यहोवाच्या सेवकांचा वाटा [वारसा]. . . आहे.”—यश. ५४:१७, पं.र.भा.
१. मानवजातीकरता यहोवाने कोणती माहिती प्रेमळपणे जतन करून ठेवली आहे?
यहोवा जिवंत देव आहे; त्याला आदी वा अंत नाही. आणि सर्वकाळ जगण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्याने आपल्याला सांगितले आहे. त्याने दिलेले हे जीवनदायी ज्ञान आजही बदललेले नाही. बायबल सांगते: “यहोवाचे वचन सर्वकाळ टिकून राहते.” (१ पेत्र १:२३-२५, NW) ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती यहोवाने प्रेमळपणे त्याच्या लिखित वचनात, म्हणजेच बायबलमध्ये आपल्याकरता आजवर जतन करून ठेवल्याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत!
२. देवाने त्याच्या लिखित वचनात त्याच्या लोकांसाठी काय जतन करून ठेवले आहे?
२ देवाने स्वतःकरता निवडलेले नाव त्याच्या लोकांनी वापरावे म्हणून त्याने ते आपल्या वचनात जतन केले आहे. शास्त्रवचनांत “आकाशे व पृथ्वी यांचा उत्पत्तिक्रम” सांगताना “यहोवा” देवाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. (प्रारंभ २:४, पं.र.भा.) ज्या दगडी पाट्यांवर दहा आज्ञा कोरण्यात आल्या होत्या, त्यांवर देवाचे नाव चमत्कारिक रीत्या अनेक वेळा लिहिण्यात आले. उदाहरणार्थ, पहिली आज्ञा अशा प्रकारे सुरू होते: “मी यहोवा तुझा देव आहे.” (निर्ग. २०:१-१७, पं.र.भा.) देवाचे नाव आजही अस्तित्वात आहे कारण सैतानाने देवाचे वचन व त्याचे नाव मिटवून टाकण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला असूनही, सार्वभौम प्रभू यहोवाने त्याच्या वचनाचे व नावाचे आजवर संरक्षण केले आहे.
३. आज मोठ्या प्रमाणात खोट्या धार्मिक शिकवणी दिल्या जात असल्या, तरी देवाने काय जतन करून ठेवले आहे?
३ यहोवाने आपल्या वचनात सत्यदेखील जतन करून ठेवले आहे. आज जगभरात मोठ्या प्रमाणात खोट्या धार्मिक शिकवणी दिल्या जात आहेत. पण देवाने आपल्याला आध्यात्मिक प्रकाश व सत्य दिले आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! (स्तोत्र ४३:३, ४ वाचा.) आज बहुतांश मानवजात अंधारात चाचपडत असताना, आपण देवाने दिलेल्या आध्यात्मिक प्रकाशात आनंदाने चालत आहोत.—१ योहा. १:६, ७.
एक अतिशय मौल्यवान वारसा
४, ५. आपल्याला १९३१ पासून कोणता खास विशेषाधिकार लाभला आहे?
४ खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्याला एक अतिशय मौल्यवान वारसा लाभला आहे. एका शब्दकोशानुसार: “एखाद्या देशाचा वारसा म्हणजे वर्षानुवर्षे चालत आलेली आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिली जाणारी त्याची गुणवैशिष्ट्ये व परंपरा.” आपल्या आध्यात्मिक वारशात आपल्याला लाभलेले देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान व देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दलची सुस्पष्ट समज समाविष्ट आहे. तसेच या वारशात एक अतिशय खास असा विशेषाधिकारदेखील समाविष्ट आहे.
५ अमेरिकेतील ओहायो राज्यात कलंबस येथे १९३१ साली झालेल्या एका अधिवेशनात हा विशेषाधिकार आपल्याला लाभला. त्या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर इंग्रजीतील “JW” ही अक्षरे छापलेली होती. एका बहिणीने सांगितले: “या अक्षरांचा काय अर्थ असावा याबद्दल सर्व जण अंदाज लावत होते.” त्या वेळेपर्यंत आपल्याला बायबल विद्यार्थी या नावाने ओळखले जात होते, पण रविवार, २६ जुलै, १९३१ रोजी एका ठरावाद्वारे आपण यहोवाचे साक्षीदार (Jehovah’s Witnesses) हे नाव स्वीकारले. बायबलवर आधारित असलेले हे नाव आपण स्वीकारले तो क्षण अतिशय रोमांचक होता. (यशया ४३:१२ वाचा.) एका बांधवाने सांगितले, “उपस्थितांनी मोठ्यानं दिलेल्या प्रतिसादानं आणि टाळ्यांच्या गडगडाटानं सभागृह कसं दणाणलं होतं हे मला आजही आठवतं.” जगात इतर कोणालाही ते नाव नको होते, पण आठ दशकांपेक्षा जास्त काळापासून हे नाव धारण करण्याचा आशीर्वाद देवाने आपल्याला दिला आहे. खरोखर, यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणे हा किती मोठा विशेषाधिकार आहे!
६. कोणती अचूक माहिती आपल्या आध्यात्मिक वारशात समाविष्ट आहे?
६ गतकाळाविषयीच्या अचूक व मौल्यवान माहितीचा भांडार हादेखील आपल्या आध्यात्मिक वारशाचा एक भाग आहे. उदाहरणार्थ अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याविषयी विचार करा. हे कुटुंबप्रमुख, यहोवाला कसे आनंदित करावे याविषयी आपापल्या कुटुंबांसोबत नक्कीच चर्चा करत असतील. म्हणूनच तर नीतिमान योसेफासमोर लैंगिक अनैतिकतेचे प्रलोभन आले तेव्हा त्याने त्याचा धिक्कार केला, कारण त्याला “देवाच्या विरुद्ध पाप” करायचे नव्हते. (उत्प. ३९:७-९) ख्रिस्ती रीतिभाती तोंडी व उदाहरणाद्वारेही पुढच्या पिढीला देण्यात आले. याचे एक उदाहरण म्हणजे पौलाने ख्रिस्ती मंडळ्यांना कळवलेल्या प्रभूच्या सांजभोजनाविषयीच्या सूचना. (१ करिंथ. ११:२, २३) आज, “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना करण्यासंबंधी आवश्यक माहिती देवाच्या लिखित वचनात सापडते. (योहान ४:२३, २४ वाचा.) तसे तर, बायबलमधील ज्ञान हे सर्व मानवजातीसाठी आहे, पण यहोवाचे सेवक या नात्याने आपण त्याची खास कदर करतो.
७. आपल्याला लाभलेल्या वारशात कोणते दिलासादायक आश्वासन समाविष्ट आहे?
७ आपल्या आध्यात्मिक वारशाचा आणखी एक पैलू म्हणजे, आधुनिक काळात प्रकाशित करण्यात आलेले अहवाल, जे दाखवून देतात की यहोवा आपला “साहाय्यकर्ता” आहे. (स्तो. ११८:७) अशा प्रकारच्या अहवालांमुळे, आपला छळ होत असतानाही आपल्याला सुरक्षित वाटते. बायबलमध्ये हे आश्वासन देण्यात आले आहे: “जे कोणतेही हत्यार तुझ्याविरुद्ध चालवायला घडलेले आहे ते साधणार नाही; आणि जी प्रत्येक जीभ न्यायात तुझ्याविरुद्ध वाद करायला उठेल ती तू अन्यायी ठरवशील. हाच यहोवाच्या सेवकांचा वाटा [वारसा] आणि हेच माझ्यापासून त्यांचे न्यायीपण आहे, असे यहोवा म्हणतो.” (यश. ५४:१७, पं.र.भा.) हे दिलासादायक आश्वासन आपल्याला लाभलेल्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचा भाग आहे. सैतानाचे कोणतेही शस्त्र आपले कायमस्वरूपी नुकसान करू शकत नाही.
८. या व पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
८ सैतानाने देवाचे वचन नष्ट करण्याचा, यहोवाच्या नावाचे अस्तित्व मिटवून टाकण्याचा आणि सत्यास दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो अयशस्वी ठरला आहे कारण यहोवाने त्याचे हे सर्व प्रयत्न फोल ठरवले आहेत. या व पुढील लेखात आपण पाहणार आहोत की (१) देवाने कशा प्रकारे त्याचे वचन आजवर जतन करून ठेवले आहे; (२) यहोवाने कशा प्रकारे त्याच्या नावाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे आणि (३) कशा प्रकारे आपला स्वर्गीय पिता सत्याचा स्रोत व संरक्षक ठरला आहे.
यहोवाने त्याच्या वचनाचे जतन केले आहे
९-११. अनेक मार्गांनी हल्ले होऊनही बायबल आजपर्यंत टिकून राहिले आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?
९ देवाच्या वचनावर अनेक मार्गांनी घाला घालण्यात आला. पण यहोवाने त्याच्या वचनाचे जतन केले आहे. कॅथलिक एन्सायक्लोपीडिया यात असे म्हटले आहे: “ॲल्बीजेन्स आणि वॅल्डेन्स यांची चळवळ रोखण्यासाठी सन १२२९ मध्ये टुलूझच्या परिषदेत, सामान्य लोकांनी [त्यांच्या भाषेत] बायबलचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. . . . स्पेनमधील टारागोना येथे १२३४ मध्ये जेम्स पहिला याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतही अशाच प्रकारचा हुकूम जारी करण्यात आला. . . . या संदर्भात, १५५९ मध्ये रोमन कॅथलिक चर्चने पहिल्यांदा हस्तक्षेप केला. त्या वेळी, पौल चौथा याने चर्चच्या परवानगीशिवाय सामान्य लोकांच्या भाषेत बायबलचे मुद्रण करण्यावर व ते जवळ बाळगण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला.”
१० अशा प्रकारे बायबलवर निरनिराळ्या मार्गांनी हल्ले झाले असले, तरीसुद्धा ते आजपर्यंत टिकून राहिले आहे. १३८२ च्या सुमारास जॉन विक्लिफ आणि त्याच्या साथीदारांनी इंग्रजीतील पहिले बायबल भाषांतर तयार केले. आणखी एक बायबल अनुवादक होता विल्यम टिंडेल, ज्याला १५३६ मध्ये जिवे मारण्यात आले. असे सांगितले जाते की वधस्तंभाला बांधलेले असताना टिंडेल मोठ्याने म्हणाला, “हे प्रभू, इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड.” त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला मारण्यात आले व जाळून टाकण्यात आले.
११ बराच विरोध होऊनही बायबल नामशेष झाले नाही. उदाहरणार्थ, १५३५ मध्ये माइल्स कव्हरडेल याने केलेले इंग्रजी भाषांतर प्रकाशित झाले. कव्हरडेल याने “नवा करार” आणि “जुन्या करारातील” उत्पत्तिपासून पहिल्या व दुसऱ्या इतिहासापर्यंतचा भाग टिंडेलच्या भाषांतरातून घेतला. शास्त्रवचनांच्या इतर भागांचे भाषांतर त्याने लॅटिन बायबलच्या आणि मार्टिन लूथर याच्या जर्मन भाषेतील बायबलच्या साहाय्याने केले. आज आपल्याजवळ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स हे सुस्पष्ट, मूळ भाषांतील मजकुराशी जुळणारे व सेवाकार्यात उपयोगी ठरणारे भाषांतर असल्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो. खरोखर, यहोवाच्या वचनाचे जतन करण्यात कोणतीही दुरात्मिक वा मानवी शक्ती अडथळा आणू शकत नाही.
यहोवाने त्याच्या नावाचे जतन केले आहे
१२. देवाचे नाव जतन करण्यात न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतराची काय भूमिका आहे?
१२ यहोवा देवाने त्याच्या वचनात त्याचे नाव जतन केले जाईल याची खातरी केली आहे. या बाबतीत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतराची एक महत्त्वाची भूमिका आहे. या भाषांतराच्या प्रस्तावनेत त्याच्या समर्पित अनुवादकांच्या समितीने असे लिहिले: “या बायबल अनुवादाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, मूळ भाषेत देवाचे नाव ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी इंग्रजी मजकुरात ते घालण्यात आले आहे. ‘जेहोवा’ या सामान्यपणे स्वीकारल्या जाणाऱ्या रूपात ते वापरण्यात आले असून, इब्री शास्त्रवचनांत ६,९७३ वेळा, तर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत २३७ वेळा त्याचा उपयोग करण्यात आला आहे.” न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे संपूर्ण भाषांतर किंवा त्याचा काही भाग आज ११६ पेक्षा जास्त भाषांत उपलब्ध असून त्याच्या १७,८५,४५,८६२ पेक्षा जास्त प्रती छापण्यात आल्या आहेत.
१३. मानव इतिहासाच्या सुरुवातीपासूनच लोकांना देवाचे नाव माहीत आहे असे कशावरून म्हणता येईल?
१३ मानव इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासूनच देवाचे नाव लोकांना माहीत होते. आदाम व हव्वेला ते माहीत होते आणि त्यांनी देवाचे नाव उच्चारलेदेखील होते. जलप्रलयानंतर जेव्हा हामने आपल्या पित्याबद्दल अनादर दाखवला तेव्हा त्याच्या पित्याने, नोहाने असे म्हटले: “शेमाचा देव यहोवा धन्यवादित असो; आणि [हामचा पुत्र] कनान त्याचा दास होवो.” (प्रारंभ ४:१; ९:२६, पं.र.भा.) देवाने स्वतः म्हटले होते: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे; आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही.” तसेच, देवाने असेही म्हटले: “मीच यहोवा आहे, दुसरा कोणी नाही, माझ्यावाचून कोणी देव नाही.” (यश. ४२:८; ४५:५, पं.र.भा.) यहोवाने त्याच्या नावाचे अस्तित्व टिकून राहील आणि सबंध पृथ्वीवरील लोकांपर्यंत ते नाव पोचेल याची खातरी केली आहे. यहोवाच्या नावाचा वापर करण्याचा आणि त्याचे साक्षीदार म्हणून सेवा करण्याचा किती मोठा विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे! आपण जणू असे म्हणतो: “आमच्या देवाच्या नावाने आम्ही आपले झेंडे उभारू.”—स्तो. २०:५, पं.र.भा.
१४. बायबलव्यतिरिक्त देवाचे नाव आणखी कोठे आढळते?
१४ देवाचे नाव केवळ बायबलमध्ये आढळते असे नाही. उदाहरणार्थ, मृत समुद्राच्या पूर्वेकडे २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या थीबान येथे सापडलेल्या मोॲबाइट शिळेचा विचार करा. या शिलालेखावर इस्राएलचा राजा अम्री याचा उल्लेख आणि राजा मेशा याने इस्राएलविरुद्ध केलेल्या बंडाचा त्याने दिलेला अहवाल आढळतो. (१ राजे १६:२८; २ राजे १:१; ३:४, ५) पण हा मोॲबाइट शिलालेख आणखीनच खास यासाठी आहे कारण त्यावर देवाच्या नावास सूचित करणारी चार इब्री अक्षरे आढळतात. लॅखिश लेटर्स या इस्राएलमध्ये सापडलेल्या मातीच्या पात्रांच्या तुकड्यांवरील लेखांतही देवाच्या नावाची चार इब्री अक्षरे वारंवार आढळतात.
१५. सेप्टुअजिंट काय आहे आणि ते कसे काय अस्तित्वात आले?
१५ देवाच्या नावाचे जतन करण्यात सुरुवातीच्या बायबल अनुवादकांनीही भूमिका बजावली. इ.स.पू. ६०७ पासून इ.स.पू. ५३७ पर्यंत यहुदी बॅबिलोनमध्ये बंदिवासात होते. त्यांची सुटका झाल्यानंतर बरेच यहुदी, यहूदाला व इस्राएलला परतले नाहीत. इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत कित्येक यहुदी इजिप्तमधील ॲलेक्झांड्रियामध्ये राहू लागले होते आणि त्यांना तेव्हाची आंतरराष्ट्रीय भाषा असलेल्या ग्रीकमध्ये इब्री शास्त्रवचनांच्या एका भाषांतराची गरज भासू लागली. ते भाषांतर इ.स.पू. दुसऱ्या शतकाच्या सुमारास पूर्ण झाले आणि त्यालाच सेप्टुअजिंट म्हणतात. त्याच्या काही प्रतींमध्ये इब्री भाषेतील चार अक्षरांत यहोवाचे नाव आढळते.
१६. पहिल्यांदा १६४० मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात देवाचे नाव कशा प्रकारे वापरण्यात आले याचे उदाहरण द्या.
१६ इंग्लंडहून अमेरिकेला गेलेल्या लोकांच्या वसाहतींत प्रकाशित झालेल्या बे साम बुक (स्तोत्रांचे पुस्तक) या अगदी पहिल्या प्रकाशनात देवाचे नाव आढळते. त्याच्या मूळ आवृत्तीत (१६४० मध्ये मुद्रित) इब्री भाषेतून त्या काळातील इंग्रजीत भाषांतरित केलेली स्तोत्रे आढळतात. त्यातील काही उताऱ्यांत देवाचे नाव आढळते. उदाहरणार्थ, स्तोत्र १:१, २ यात असे म्हटले आहे की “धन्य तो पुरुष” जो दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, तर “यहोवाच्या नियमशास्त्राची त्याच्या जिवाला उत्कंठा आहे.” देवाच्या नावाविषयी अधिक माहितीसाठी, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे १९५-१९७ पाहा.
यहोवा आध्यात्मिक सत्याचे जतन करतो
१७, १८. (क) तुम्ही “सत्य” या शब्दाची परिभाषा कशी द्याल? (ख) सुवार्तेच्या सत्यात कशाचा समावेश होतो?
१७ आपण आनंदाने यहोवाची सेवा करतो, जो सत्याचा देव आहे. (स्तोत्र ३१:५, पं.र.भा.) एका शब्दकोशानुसार, “सत्य म्हणजे मनोकल्पित गोष्टी नव्हे, तर एखाद्या गोष्टीविषयीच्या सगळ्या वस्तुस्थिती.” बायबलमध्ये ज्या इब्री भाषेतील शब्दाचे “सत्य” असे भाषांतर करण्यात आले आहे त्याचा अर्थ खरे, भरवशालायक, विश्वसनीय किंवा वास्तवावर आधारित असा होतो. “सत्य” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, वास्तवाशी जुळणारे किंवा योग्य व उचित असा आहे.
१८ यहोवाने आध्यात्मिक सत्याचे जतन केले आहे आणि त्याविषयीचे ज्ञान आपल्याला विपुल व अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. (२ योहा. १, २) सत्याविषयीची आपली समज अधिकाधिक स्पष्ट होत चालली आहे, कारण “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे,” असे बायबल म्हणते. (नीति. ४:१८) येशूने देवाला प्रार्थनेत म्हटलेल्या या शब्दांशी आपण पूर्णपणे सहमत आहोत: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहा. १७:१७) देवाच्या लिखित वचनात सुवार्तेचे सत्य, म्हणजेच, एकंदरीत सर्व ख्रिस्ती शिकवणी आहेत. (गलती. २:१४) उदाहरणार्थ, यात यहोवाचे नाव, त्याचे सार्वभौमत्व, येशूचे खंडणी बलिदान, पुनरुत्थान व देवाचे राज्य यांविषयीची खरी माहिती समाविष्ट आहे. या सत्याला दडपून टाकण्याचा सैतानाने अनेक प्रकारे प्रयत्न करूनही देवाने ते कशा प्रकारे जतन करून ठेवले आहे हे आता आपण पाहू या.
सत्यावर केलेला एक आघात यहोवा फोल ठरवतो
१९, २०. निम्रोद कोण होता आणि त्याच्या काळात कोणता प्रकल्प असफल ठरला?
१९ जलप्रलयानंतर अशी एक म्हण होती: “यहोवासमोर बलवान पारधी.” (प्रारंभ १०:९, पं.र.भा.) यहोवा देवाचा विरोधी असलेला निम्रोद एका अर्थाने सैतानाचा उपासक होता आणि येशूने ज्यांच्याविषयी पुढीलप्रमाणे म्हटले त्या विरोधकांसारखा तो होता: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. . . . तो सत्यात टिकला नाही.”—योहा. ८:४४.
२० निम्रोदाच्या अधिकाराखाली बाबेल, आणि त्यासोबतच टिग्रिस व फरात या नद्यांच्या क्षेत्रात वसलेली इतर शहरेदेखील होती. (उत्प. १०:१०) कदाचित त्याच्याच नेतृत्वाखाली इ.स.पू. २२६९ च्या सुमारास बाबेलचे व त्यातील बुरुजाचे बांधकाम सुरू झाले असावे. यहोवाची इच्छा होती की मानवजातीने सर्व पृथ्वीवर पसरावे. पण त्याच्या या इच्छेच्या विरोधात जाऊन या बांधकाम करणाऱ्यांनी म्हटले: “चला, आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.” पण त्यांना आपला बांधकामाचा प्रकल्प अर्ध्यातच सोडावा लागला, कारण देवाने “सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून” बुरूज बांधणाऱ्या त्या लोकांना सबंध पृथ्वीवर पांगवले. (उत्प. ११:१-४, ८, ९) सर्व मानव आपली उपासना करतील अशा प्रकारचा एक धर्म सुरू करावा, हा जर या सर्वामागे सैतानाचा इरादा असेल, तर त्याचा हा बेत पूर्णपणे असफल ठरला. सबंध मानव इतिहासादरम्यान यहोवाची उपासना टिकून राहिली आहे आणि त्याच्या उपासकांच्या संख्येत दिवसागणिक भर पडतच आहे.
२१, २२. (क) खोट्या धर्मापासून खऱ्या उपासनेला कधीच कोणताही धोका नव्हता असे का म्हणता येईल? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
२१ वास्तविक, खोट्या धर्मापासून खऱ्या उपासनेला कधीच कोणताही धोका नव्हता. का? कारण आपल्या महान शिक्षकाने त्याच्या लिखित वचनाचे जतन केले आहे; त्याचे नाव सर्व मानवजातीपुढे आणले आहे आणि आध्यात्मिक सत्य विपुल प्रमाणात पुरवले आहे. (यश. ३०:२०, २१) सत्याच्या आधारावर देवाची उपासना केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण असे करण्यासाठी आपण आध्यात्मिक रीत्या जागरूक राहिले पाहिजे आणि यहोवावर व त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे विसंबून राहिले पाहिजे.
२२ पुढील लेखात, काही खोटे सिद्धान्त कशा प्रकारे उदयास आले याचे आपण परीक्षण करू. शास्त्रवचनांच्या प्रकाशात हे सिद्धान्त तपासून पाहिल्यास त्यांत काहीही तथ्य नसल्याचे आपल्या लक्षात येईल. शिवाय, सत्याचे अद्भुत रीत्या जतन करणाऱ्या यहोवाने, आपल्या आध्यात्मिक वारशाचा भाग असलेल्या खऱ्या शिकवणी देऊन आपल्याला कशा प्रकारे आशीर्वादित केले आहे हेदेखील आपण पाहू.