जगात इतके दुःख का?
जगात इतके दुःख का आहे आणि ते दूर करण्यात मानवांचे प्रयत्न निष्फळ का ठरले आहेत हे जाणून घेण्याआधी दुःखाची खरी कारणे आपण ओळखली पाहिजेत. त्याची कारणे वेगवेगळी व गुंतागुंतीची असली तरी ती ओळखण्यास देवाचे वचन, बायबल आपल्याला मदत करते याबद्दल आपण किती आभारी आहोत! जगात इतके दुःख का आहे याच्या पाच मूलभूत कारणांचे या लेखात आपण परीक्षण करणार आहोत. या महत्त्वपूर्ण समस्येमागचे मूळ कारण काय हे स्पष्टपणे समजून घेण्यास बायबल आपल्याला मदत करते. त्याचे बारकाईने परीक्षण करण्याचे उत्तेजन आम्ही तुम्हाला देतो.—२ तीमथ्य ३:१६.
भ्रष्ट सरकार
“दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते.” —नीतिसूत्रे २९:२.
इतिहासात अशा अनेक हुकूमशहांची उदाहरणे सापडतात ज्यांनी धाकदपटशा करून आपल्या लोकांना अपरिमित दुःख दिले. अर्थात, सगळेच राज्यकर्ते असे असतात असे नाही. काहींना आपल्या लोकांचे भले करण्याची मनस्वी इच्छा असते आणि त्या दिशेने ते प्रयत्नसुद्धा करतात. पण, सत्ता हातात आल्यावर काय पाहायला मिळते? एकतर, आंतरिक संघर्षांमुळे किंवा सत्तेच्या चढाओढीमुळे त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरते; किंवा मग, लोकांची तमा न बाळगता ते आपल्या स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करतात. अमेरिकेचे माजी सचिव हेन्री किसिंगर यांनी म्हटले: “इतिहास हा फसलेल्या प्रयत्नांची आणि पूर्ण न झालेल्या स्वप्नांची एक लांबलचक कथाच आहे.”
बायबल असेही म्हणते: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) आपले सगळे कारभार यशस्वीपणे हाताळण्यासाठी लागणारी बुद्धी व दूरदृष्टी मानवांजवळ नाही. मानव जर स्वतःचाच मार्ग नीट आखू शकत नाही, तर देशाचा कसा आखू शकेल? बरेचदा असे पाहायला मिळते, की भ्रष्ट सरकारच दुःखाला कारणीभूत असते. तर मग, मानवी राज्यकर्ते जगातील दुःख नाहीसे का करू शकत नाही हे तुमच्या लक्षात आले का?
खोट्या धर्माचा प्रभाव
“तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.
सर्वच जातीधर्मांतून प्रेमाची आणि एकतेची शिकवण दिली जाते. पण वास्तविकता ही आहे की लोकांच्या मनातील भेदभाव नष्ट करण्यात धर्मगुरू अपयशी ठरले आहेत. लोकांमध्ये प्रेमाची भावना वाढीस लावण्याऐवजी धर्माने बरेचदा फुटी, कट्टरता आणि लोकांमधील व राष्ट्रीय गटांमधील कलह यांस खतपाणी घातले आहे. ख्रिश्चॅनिटी ॲण्ड द वर्ल्ड्स रिलिजन्स या पुस्तकात हॅन्स कूंग या धर्मशास्त्रज्ञाने शेवटी म्हटले: “धर्माच्या नावाखाली झालेले राजकीय संघर्ष हे सगळ्यात धर्मांध आणि क्रूर प्रकारचे संघर्ष आहेत.”
याशिवाय, अनेक धर्मगुरूंनी विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंधाला आणि समलैंगिकतेला उघडउघड मान्यता दिली आहे. याचा परिणाम निरनिराळे रोग, गर्भपात, नको असलेली गर्भधारणा, मोडकळीस आलेले विवाह व कुटुंबे यांत झाला असून यांमुळे अपरिमित दुःख आणि मानसिक यातना उत्पन्न झाल्या आहेत.
मानवी अपरिपूर्णता आणि स्वार्थी इच्छा
“प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.”—याकोब १:१४, १५.
वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आपण सगळेच चुकतो आणि आपल्या सगळ्यांनाच दैहिक इच्छाअभिलाषा तृप्त करण्याच्या मोहाचा सामना करावा लागतो. (इफिसकर २:३) जेव्हा चुकीची इच्छा आणि ती तृप्त करण्याची संधी जुळून येते तेव्हा त्यावर मात करणे खरोखर खूप कठीण असते. आपण जर चुकीच्या इच्छांना बळी पडलो तर त्याच्या भयंकर परिणामांपासून आपण वाचू शकणार नाही.
पी. डी. मेहता या लेखकाने असे म्हटले: “आपल्या वाट्याला जे दुःख येतं ते सहसा आपल्या स्वतःच्या वासना, चैनबाजी, स्वैराचार, हव्यास किंवा अभिलाषा यांमुळं येतं.” हव्यास आणि व्यसन, मग ते कोणतेही असो मद्याचे, ड्रग्सचे, जुगाराचे, सेक्सचे, त्यामुळे अनेक “प्रतिष्ठितांचे” जीवन उद्ध्वस्त झाले आहे व त्याचे दुःखद परिणाम त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना व इतरांनाही भोगावे लागले आहेत. मानवाची अपरिपूर्ण स्थिती लक्षात घेता बायबल जे म्हणते ते आपण मान्य केले पाहिजे: “आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.”—रोमकर ८:२२.
शक्तिशाली दुष्ट आत्मे
बायबल असे सांगते की सैतान या युगाचा देव असून त्याच्या बाजूने अनेक शक्तिशाली दुरात्मे किंवा दुष्ट आत्मे आहेत.—२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:९.
हे दुरात्मे सैतानाप्रमाणेच लोकांना कह्यात ठेवण्यात व त्यांची दिशाभूल करण्यात जीव ओतून प्रयत्न करत आहेत. या गोष्टीला प्रेषित पौलानेही दुजोरा दिला. त्याने म्हटले: “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”—इफिसकर ६:१२.
लोकांना छळण्यात दुरात्म्यांना आनंद मिळत असला तरी केवळ तेवढ्यासाठीच ते त्यांचा छळ करतात असे नाही; तर त्यांचा मुख्य हेतू लोकांना सर्वोच्च देव, यहोवा याच्यापासून दूर नेणे हा आहे. (स्तोत्र ८३:१८) लोकांची फसवणूक करण्यासाठी व त्यांना कह्यात ठेवण्यासाठी दुरात्मे निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग करतात. ज्योतिषशास्त्र, जादूटोणा, भविष्य सांगणे ही त्यांपैकी केवळ काही माध्यमे आहेत. म्हणूनच यहोवा आपल्याला अशा धोकादायक गोष्टींपासून दूर राहण्याचा इशारा देतो आणि जे लोक सैतानाचा व त्याच्या दुरात्म्यांचा विरोध करतात त्यांचे तो रक्षण करतो.—याकोब ४:७.
आपण “शेवटल्या” काळात जगत आहोत
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.”
शेवटला काळ इतका कठीण का असेल याचे कारण सांगताना बायबल पुढे म्हणते: “कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, . . . ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी . . . अशी ती होतील.” यावरून स्पष्ट होते, की आपल्या दुःखाचे एक मुख्य कारण म्हणजे आपण “शेवटल्या” काळात जगत आहोत.—२ तीमथ्य ३:१-५.
आपण आतापर्यंत ज्या मुद्द्यांची चर्चा केली त्यांवरून, मानवांचे हेतू कितीही चांगले असले तरी ते आपले दुःख नाहीसे का करू शकत नाहीत हे स्पष्ट होत नाही का? मग, दुःख नाहीसे करण्यासाठी आपण कोणावर आशा लावावी? त्यासाठी आपण आपल्या निर्माणकर्त्यावर आशा लावावी. कारण त्याने, सैतानाची व त्याच्या साथीदारांची “कृत्ये नष्ट” करण्याचे अभिवचन आपल्याला दिले आहे. (१ योहान ३:८) दुःखाची सर्व कारणे दूर करण्यासाठी देव लवकरच काय करेल हे आपण पुढच्या लेखात पाहू. (w१३-E ०९/०१)