इब्री लोकांना पत्र १०:१-३९
१० नियमशास्त्र हे पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींचं+ खरं स्वरूप नाही, तर फक्त छाया आहे.+ त्यामुळे, वर्षांनुवर्षं सतत अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच बलिदानांद्वारे ते* देवाजवळ येणाऱ्याला कधीच परिपूर्ण करू शकत नाही.+
२ जर करू शकलं असतं, तर बलिदानं अर्पण करण्याचं बंद झालं नसतं का? कारण, पवित्र सेवा करणारे एकदाच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पुन्हा कधीच त्यांना पापांची जाणीव झाली नसती.
३ पण याउलट, ही बलिदानं दरवर्षी लोकांना त्यांच्या पापांची आठवण करून देतात.+
४ कारण, बैलांच्या किंवा बकऱ्यांच्या रक्ताने पापं नाहीशी होणं शक्य नाही.
५ म्हणून, तो जगात आला तेव्हा म्हणाला: “ ‘तुला बलिदानं आणि अर्पणं नको होती, तर तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलं.
६ तुला होमार्पणं आणि पापार्पणं मान्य नव्हती.’+
७ तेव्हा मी म्हणालो: ‘हे देवा, पाहा! (गुंडाळीत* माझ्याबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे) तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.’ ”+
८ आधी तो म्हणतो: “तुला बलिदानं आणि अर्पणं, होमार्पणं आणि पापार्पणं नको होती आणि तुला ती मान्यही नव्हती.” ही नियमशास्त्राप्रमाणे दिली जाणारी अर्पणं आहेत.
९ मग तो म्हणतो: “पाहा! तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.”+ दुसरं स्थापन करण्यासाठी तो पहिलं नाहीसं करतो.
१० याच ‘इच्छेमुळे,’+ सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.+
११ तसंच, प्रत्येक याजक पवित्र सेवा*+ करण्यासाठी आणि वारंवार तीच बलिदानं अर्पण करण्यासाठी दररोज आपल्या जागी उभा राहतो.+ पण या बलिदानांमुळे पापं कधीच पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाहीत.+
१२ या माणसाने मात्र पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.+
१३ तेव्हापासून तो त्या वेळेची वाट पाहत आहे, जेव्हा त्याच्या शत्रूंना त्याच्या पायांसाठी आसन केलं जाईल.+
१४ कारण, पवित्र केलं जाणाऱ्यांना त्याने फक्त एकच बलिदान अर्पण करून सर्वकाळासाठी परिपूर्ण केलं आहे.+
१५ शिवाय, पवित्र शक्तीसुद्धा* आपल्याला साक्ष देते, कारण आधी ती म्हणते:
१६ “यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन.’ ”+
१७ मग पवित्र शक्ती म्हणते: “मी त्यांची पापं आणि त्यांचे अपराध पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.”+
१८ आता ज्या पापांची क्षमा झाली आहे, त्यांसाठी आणखी कोणतंही अर्पण द्यायची गरज नाही.
१९ तर बांधवांनो, येशूच्या रक्तामुळेच आपल्याला परमपवित्र स्थानाकडे नेणाऱ्या मार्गावर चालत राहण्याचं धैर्य* मिळालं आहे.+
२० त्याने आपल्यासाठी एक नवीन आणि जिवंत मार्ग खुला केला* आहे. तो पडद्याला पार करून जातो.+ हा पडदा म्हणजे त्याचं शरीर.
२१ शिवाय, आपल्यासाठी देवाच्या घरावर देखरेख करणारा एक महान याजक असल्यामुळे,+
२२ आपण सगळे जण प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्वासाने देवाजवळ जाऊ या. कारण, आपली मनं रक्त शिंपडून दुष्ट विवेकापासून शुद्ध करण्यात आली आहेत+ आणि आपली शरीरं शुद्ध पाण्याने धुण्यात आली आहेत.+
२३ आपण न डगमगता, आपल्या आशेची सर्वांसमोर घोषणा करत राहू या.+ कारण ज्याने अभिवचन दिलं आहे तो विश्वसनीय आहे.
२४ आणि एकमेकांचा विचार करून* आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.*+
२५ तसंच, काहींची रीत आहे त्याप्रमाणे आपण एकत्र येणं सोडू नये,+ तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावं+ आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो, तसतसं हे आणखी जास्त करावं.+
२६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+
२७ त्याऐवजी, भयंकर न्यायदंडाची भीती आणि विरोधकांना भस्म करणारा जळजळीत क्रोध, इतकंच उरतं.+
२८ मोशेच्या नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडणाऱ्याला, दोघा किंवा तिघांच्या साक्षीवरून दयामाया न दाखवता मृत्युदंड दिला जातो.+
२९ तर मग, जी व्यक्ती देवाच्या मुलाला पायाखाली तुडवते आणि कराराच्या ज्या रक्ताद्वारे+ तिला पवित्र करण्यात आलं होतं त्याला क्षुल्लक लेखते, तसंच पवित्र शक्तीद्वारे मिळालेल्या अपार कृपेला तुच्छ लेखते, ती आणखीनच मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहे असं तुम्हाला वाटत नाही का?+
३० कारण “सूड घेणं माझं काम आहे; मी परतफेड करीन,” असं ज्याने म्हटलं त्याला आपण ओळखतो. तसंच, असंही लिहिण्यात आलं आहे: “यहोवा* आपल्या लोकांचा न्याय करेल.”+
३१ जिवंत देवाच्या हातात सापडणं ही भयंकर गोष्ट आहे.
३२ पण, पूर्वीचे ते दिवस आठवत राहा, जेव्हा ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यावर+ तुम्ही मोठा संघर्ष करून धीराने दुःखं सोसली.
३३ काही वेळा, जाहीरपणे* तुमचा अपमान आणि छळ करण्यात आला; तर काही वेळा, अशा गोष्टी सोसणाऱ्यांना तुम्ही त्यांच्या दुःखात साथ दिली.*
३४ कारण, जे तुरुंगात होते त्यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूती दाखवली आणि तुमची मालमत्ता लुटण्यात आली, तरी तुम्ही ते आनंदाने सहन केलं.+ आपल्याजवळ यापेक्षा चांगली आणि कायम टिकणारी संपत्ती आहे,+ याची जाणीव असल्यामुळे तुम्ही असं केलं.
३५ त्यामुळे, आपलं धैर्य* गमावू नका, कारण याबद्दल पुढे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+
३६ देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.+
३७ कारण, “खूप थोडा वेळ” उरला आहे+ आणि “जो येणार आहे तो येईल, तो उशीर करणार नाही.”+
३८ “पण माझा नीतिमान सेवक आपल्या विश्वासामुळे जगेल,”+ आणि “जर त्याने माघार घेतली, तर मला* त्याच्याबद्दल मुळीच आनंद वाटणार नाही.”+
३९ पण, आपण मात्र माघार घेऊन नाश होणाऱ्यांपैकी नाही,+ तर ज्यामुळे आपलं जीवन* वाचेल असा विश्वास बाळगणाऱ्यांपैकी आहोत.
तळटीपा
^ किंवा कदाचित, “लोक.”
^ शब्दशः “पुस्तकाच्या गुंडाळीत.”
^ किंवा “जनसेवा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आत्मविश्वास.”
^ शब्दशः “मार्गाचं उद्घाटन केलं.”
^ किंवा “काळजी करून; लक्ष देऊन.”
^ किंवा “प्रवृत्त करू या; उत्साहित करू या.”
^ शब्दशः “जणू नाट्यगृहात सर्वांसमोर.”
^ किंवा “पाठीशी उभे राहिलात.”
^ शब्दशः “मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य.”
^ किंवा “माझ्या जिवाला.”
^ किंवा “आपला जीव.”