योहानने सांगितलेला संदेश ६:१-७१
६ यानंतर येशू गालील, म्हणजेच तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला.+
२ आणि लोकांचा एक मोठा समुदायही त्याच्या मागेमागे गेला.+ कारण तो कशा प्रकारे चमत्कार* करून आजारी लोकांना बरं करत आहे हे त्यांनी पाहिलं होतं.+
३ मग येशू एका डोंगरावर जाऊन आपल्या शिष्यांसोबत बसला.
४ त्या वेळी वल्हांडण+ हा यहुदी लोकांचा सण जवळ आला होता.
५ येशूने नजर वर करून पाहिलं, तेव्हा त्याला एक मोठा लोकसमुदाय येताना दिसला. येशू फिलिप्पला म्हणाला: “या लोकांना खायला देण्यासाठी आपण भाकरी कुठून विकत घ्यायच्या?”+
६ पण तो फक्त त्याची परीक्षा पाहायला असं बोलला. कारण थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत हे त्याला माहीत होतं.
७ फिलिप्पने त्याला उत्तर दिलं: “आपण २०० दिनारांच्या* भाकरी आणल्या, तरी प्रत्येकाला थोडीथोडीही मिळणार नाही.”
८ त्याच्या शिष्यांपैकी एक असलेला, शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला:
९ “इथे एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. पण इतक्या लोकांना हे अन्न कसं पुरणार?”+
१० येशू म्हणाला: “लोकांना खाली बसायला सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत असल्यामुळे लोक त्यावर बसले. त्यांत पुरुषांची संख्या सुमारे ५,००० इतकी होती.+
११ येशूने त्या भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद दिल्यावर तिथे बसलेल्या लोकांना त्या वाटून दिल्या. मग दोन लहान मासे घेऊन त्याने तसंच केलं आणि प्रत्येकाला पाहिजे तितकं दिलं.
१२ तेव्हा सगळे पोटभर जेवल्यावर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “काहीही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”
१३ तेव्हा त्यांनी ते गोळा केले आणि पाच जवाच्या भाकरींतून उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरल्या.
१४ त्याने केलेला हा चमत्कार* पाहून लोक म्हणू लागले: “जो संदेष्टा जगात येणार होता, तो हाच आहे.”+
१५ तेव्हा लोक आपल्याला बळजबरीने राजा बनवण्यासाठी धरायला येत आहेत, हे ओळखून येशू पुन्हा एकटाच डोंगरावर+ निघून गेला.+
१६ संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले.+
१७ ते एका नावेत चढून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमला जायला निघाले. तोपर्यंत अंधार पडला होता. पण येशू अजूनही त्यांच्याजवळ परत आला नव्हता.+
१८ तसंच, जोराचा वारा वाहत असल्यामुळे समुद्र खवळू लागला होता.+
१९ पण सुमारे पाच-सहा किलोमीटरचं* अंतर पार करून गेल्यावर, त्यांना येशू समुद्रावर चालत त्यांच्या नावेकडे येताना दिसला. हे पाहून त्यांना खूप भीती वाटली.
२० पण तो त्यांना म्हणाला: “मी आहे, घाबरू नका!”+
२१ तेव्हा कुठे ते त्याला नावेत घ्यायला तयार झाले आणि काही वेळातच त्यांची नाव, त्यांना जायचं होतं त्या ठिकाणी येऊन पोहोचली.+
२२ दुसऱ्या दिवशी, समुद्राच्या अलीकडे जे लोक थांबले होते त्यांना तिथे असलेली छोटी नाव दिसली नाही. आणि त्यांना कळलं, की येशू शिष्यांसोबत त्या नावेतून गेला नव्हता, तर फक्त शिष्यच गेले होते.
२३ पण ज्या ठिकाणी प्रभूने धन्यवाद दिल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून काही नावा आल्या.
२४ तेव्हा येशू आणि त्याचे शिष्यही तिथे नाहीत, हे पाहून लोक त्या नावांमध्ये चढले आणि त्याला शोधायला कफर्णहूमला गेले.
२५ समुद्राच्या पलीकडे गेल्यावर तो त्यांना दिसला तेव्हा ते त्याला म्हणाले: “रब्बी,*+ तुम्ही इथे केव्हा आलात?”
२६ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही चमत्कार* पाहिल्यामुळे मला शोधत आला नाहीत, तर भाकरी खाऊन तुमचं पोट भरल्यामुळे शोधत आला आहात.+
२७ नाश होणाऱ्या अन्नासाठी खटपट करू नका. तर अशा अन्नासाठी खटपट करा, जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं.+ हे अन्न मनुष्याचा मुलगा तुम्हाला देईल. कारण त्याच्यावर पित्याने म्हणजे स्वतः देवाने आपल्या पसंतीची मोहर लावली आहे.”+
२८ तेव्हा ते त्याला म्हणाले: “देवाची पसंती मिळावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे?”
२९ येशूने त्यांना उत्तर दिलं: “देवाने ज्याला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवा,+ म्हणजे तुम्हाला देवाची पसंती मिळेल.”
३० तेव्हा ते त्याला म्हणाले: “आम्ही पाहून विश्वास ठेवावा म्हणून तू कोणता चमत्कार* करणार आहेस?+ कोणतं कार्य करणार आहेस?
३१ आमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला.+ त्याबद्दल असं लिहिलंय: ‘त्याने त्यांना स्वर्गातली भाकर खायला दिली.’”+
३२ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातली भाकर दिली नाही, पण माझा पिता तुम्हाला स्वर्गातली खरी भाकर देतोय.
३३ कारण जो स्वर्गातून उतरलाय आणि जो जगाला जीवन देतो, तोच देवाची भाकर आहे.”
३४ म्हणून ते त्याला म्हणाले: “प्रभू, ही भाकर आम्हाला नेहमी देत जा.”
३५ येशू त्यांना म्हणाला: “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.+
३६ पण जसं मी तुम्हाला म्हणालो होतो, तुम्ही मला पाहिलंय, तरीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही.+
३७ पित्याने मला जे दिले आहेत, ते सगळे माझ्याकडे येतील आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी कधीही दूर करणार नाही.+
३८ कारण मी स्वर्गातून,+ स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही. तर, ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करायला मी आलोय.+
३९ आणि मला पाठवणाऱ्याची हीच इच्छा आहे, की त्याने मला जे सगळे दिले आहेत, त्यांपैकी एकालाही मी गमावू नये, तर शेवटच्या दिवशी त्यांना पुन्हा जिवंत करावं.*+
४० कारण माझ्या पित्याची हीच इच्छा आहे, की जो मुलाला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.+ शेवटच्या दिवशी मी त्याला पुन्हा जिवंत करीन.”*+
४१ “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,”+ असं त्याने म्हटल्यामुळे यहुदी त्याच्याबद्दल कुरकुर करू लागले.
४२ ते म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो.+ मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलोय’?”
४३ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “कुरकुर करू नका.
४४ ज्याने मला पाठवलं त्या पित्याने आणल्याशिवाय* कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.+ आणि शेवटच्या दिवशी मी त्याला पुन्हा जिवंत करीन.*+
४५ संदेष्ट्यांच्या लिखाणांत असं लिहिलंय: ‘त्या सगळ्यांना यहोवा* शिकवेल.’+ ज्याने माझ्या पित्याचं ऐकलंय आणि त्याच्याकडून शिकून घेतलंय, तो प्रत्येक जण माझ्याकडे येतो.
४६ कोणत्याही माणसाने पित्याला पाहिलेलं नाही.+ फक्त जो देवाकडून आहे, त्यानेच पित्याला पाहिलंय.+
४७ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.+
४८ जीवन देणारी भाकर मीच आहे.+
४९ तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मेले.+
५० पण जो स्वर्गातून उतरणारी खरी भाकर खाईल तो मरणार नाही.
५१ स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर खाणारा प्रत्येक जण सर्वकाळ जगेल. आणि खरंतर, मी देत असलेली भाकर म्हणजे माझं शरीर आहे. जगाला जीवन मिळावं म्हणून मी ते देईन.”+
५२ तेव्हा यहुदी एकमेकांसोबत वाद घालू लागले आणि म्हणू लागले: “हा माणूस आपल्याला त्याचं शरीर कसं काय खायला देईल?”
५३ म्हणून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या मुलाचं मांस खात नाही आणि त्याचं रक्त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही.+
५४ जो माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो, त्याला सर्वकाळाचं जीवन मिळालंय आणि मी शेवटच्या दिवशी त्याला पुन्हा जिवंत करीन.*+
५५ कारण माझं मांस हे खरं अन्न आहे आणि माझं रक्त हे खरं पेय आहे.
५६ जो माझं मांस खातो आणि माझं रक्त पितो तो माझ्यासोबत ऐक्यात राहतो आणि मी त्याच्यासोबत ऐक्यात राहतो.+
५७ ज्या प्रकारे जिवंत पित्याने मला पाठवलं आणि मी पित्यामुळे जिवंत आहे, त्याच प्रकारे जो माझं मांस खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील.+
५८ हीच स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी जी खाल्ली आणि तरी मेले, तशी ही भाकर नाही. तर ही भाकर खाणारा सर्वकाळ जिवंत राहील.”+
५९ कफर्णहूममधल्या एका सभास्थानात* शिकवत असताना तो या गोष्टी बोलला.
६० त्या ऐकल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण म्हणाले: “काय बोलतोय हा? कोण ऐकून घेईल अशा गोष्टी?”
६१ पण शिष्य याबद्दल कुरकुर करत आहेत हे ओळखून तो त्यांना म्हणाला: “तुम्हाला माझं हे बोलणं ऐकून धक्का बसला का?
६२ मग मनुष्याचा मुलगा जिथून आला तिथे परत जाताना तुम्ही पाहाल,+ तेव्हा तुम्हाला किती मोठा धक्का बसेल?
६३ देवाची पवित्र शक्तीच* जीवन देते.+ शरीर काहीच उपयोगाचं नाही. मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललो त्या पवित्र शक्तीद्वारे आहेत आणि त्या जीवन देतात.+
६४ पण तुमच्यापैकी काही जण विश्वास ठेवत नाहीत.” विश्वास न ठेवणारे कोण आहेत आणि कोण आपल्याला पकडून देणार आहे, हे येशूला सुरुवातीपासूनच माहीत असल्यामुळे तो असं बोलला.+
६५ तो पुढे म्हणाला: “म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, की पित्याने परवानगी दिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”+
६६ यामुळे, त्याच्या शिष्यांपैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामागे चालायचं सोडून दिलं आणि पूर्वी ते ज्या गोष्टी करत होते, त्यांकडे परत गेले.+
६७ तेव्हा येशू आपल्या १२ प्रेषितांना म्हणाला: “तुम्हालाही जायचंय का?”
६८ शिमोन पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार?+ सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.+
६९ आम्ही विश्वास ठेवलाय आणि देवाचा जो पवित्र, तो तूच आहेस हे आम्ही ओळखलंय.”+
७० येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हा बाराही जणांना निवडलं नव्हतं का?+ तरी तुमच्यापैकी एक जण निंदक* आहे.”+
७१ खरंतर शिमोन इस्कर्योत याचा मुलगा यहूदा याच्याबद्दल तो बोलत होता. कारण यहूदा १२ प्रेषितांपैकी असूनसुद्धा येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देणार होता.+
तळटीपा
^ शब्दशः “चिन्हं.”
^ शब्दशः “चिन्ह.”
^ शब्दशः “२५ किंवा ३० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून एक स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.
^ किंवा “गुरुजी.”
^ शब्दशः “चिन्हं.”
^ शब्दशः “चिन्ह.”
^ किंवा “त्यांचं पुनरुत्थान करावं.” शब्दार्थसूचीत “पुनरुत्थान” पाहा.
^ किंवा “त्याचं पुनरुत्थान करीन.” शब्दार्थसूचीत “पुनरुत्थान” पाहा.
^ किंवा “आकर्षित केल्याशिवाय.”
^ किंवा “त्याचं पुनरुत्थान करीन.” शब्दार्थसूचीत “पुनरुत्थान” पाहा.
^ किंवा “त्याचं पुनरुत्थान करीन.” शब्दार्थसूचीत “पुनरुत्थान” पाहा.
^ किंवा कदाचित, “जाहीर सभेत.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दियाबल.”