लूकने सांगितलेला संदेश १९:१-४८

  • येशू जक्कयच्या घरी जातो (१-१०)

  • दहा चांदीच्या नाण्यांचं उदाहरण (११-२७)

  • येशूचा विजयी प्रवेश (२८-४०)

  • येशू यरुशलेमसाठी रडतो (४१-४४)

  • येशू मंदिर शुद्ध करतो (४५-४८)

१९  मग एकदा येशू यरीहो शहरातून जात होता. २  तिथे जक्कय नावाचा श्रीमंत माणूस होता. तो एक प्रमुख जकातदार होता. ३  हा येशू आहे तरी कोण, हे पाहायचा तो प्रयत्न करत होता. पण गर्दीमुळे त्याला दिसत नव्हतं कारण तो बुटका होता. ४  येशू त्या रस्त्याने जाणार असल्यामुळे त्याला पाहायला तो पुढे धावत जाऊन एका उंबराच्या झाडावर चढला. ५  येशू तिथे आला तेव्हा त्याने वर पाहिलं आणि तो त्याला म्हणाला: “जक्कय, लवकर खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी येणार आहे.” ६  तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने खूप आनंदाने येशूचं आपल्या घरी स्वागत केलं. ७  लोकांनी हे पाहिलं तेव्हा ते सगळे अशी कुरकुर करू लागले: “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणचाराला गेला!”+ ८  पण जक्कय उभा राहिला आणि प्रभूला म्हणाला: “प्रभू, पाहा! मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतोय. आणि ज्या कोणाकडून मी काही लुबाडलं* असेल, त्याला मी चौपट परत करतोय.”+ ९  तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आज देवाने या माणसाचं आणि त्याच्या घराण्याचं तारण केलंय. कारण हासुद्धा अब्राहामचा मुलगा आहे. १०  हरवलेल्यांना शोधायला आणि त्यांचं तारण करायलाच मनुष्याचा मुलगा आलाय.”+ ११  ते या गोष्टी ऐकत होते, तेव्हा त्याने आणखी एक उदाहरण सांगितलं. तो यरुशलेमजवळ असल्यामुळे आणि देवाचं राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज असल्यामुळे+ त्याने हे उदाहरण सांगितलं. १२  तो म्हणाला: “एक राजघराण्यातला माणूस होता. तो राज्याचा अधिकार मिळवून परत येण्याच्या उद्देशाने एका दूर देशी गेला.+ १३  जाण्याआधी त्याने आपल्या दासांपैकी दहा जणांना जवळ बोलावून, त्यांना दहा चांदीची नाणी* दिली आणि असं सांगितलं, ‘मी परत येईपर्यंत यांवर व्यापार करा.’+ १४  पण त्याच्या देशाचे लोक त्याचा द्वेष करायचे. म्हणून त्यांनी त्याच्यामागे राजदूतांना असं सांगून पाठवलं, की ‘हा माणूस आमचा राजा व्हावा अशी आमची इच्छा नाही.’ १५  नंतर जेव्हा तो राज्याधिकार* मिळवून परत आला तेव्हा ज्यांना पैसे* दिले होते, त्या दासांना त्याने बोलावलं. त्यांनी व्यापारातून कमवलेल्या पैशांचा त्याला हिशोब मागायचा होता.+ १६  तेव्हा, पहिला दास पुढे येऊन म्हणाला, ‘प्रभू, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली.’+ १७  तो त्याला म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या दासा! अगदी लहानशा गोष्टीत तू आपला विश्‍वासूपणा सिद्ध करून दाखवलास. म्हणून मी तुला दहा शहरांवर अधिकार देतो.’+ १८  मग दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘प्रभू, तुमच्या नाण्यावर मी आणखी पाच नाणी कमवली.’+ १९  तेव्हा त्यालाही तो म्हणाला, ‘तुलाही मी पाच शहरांवर अधिकार देतो.’ २०  पण आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘प्रभू, हे घ्या तुमचं नाणं. मी ते कापडात गुंडाळून लपवून ठेवलं होतं. २१  खरं सांगायचं तर, मला तुमची भीती वाटत होती. कारण तुम्ही कठोर आहात. तुम्ही जमा केले नव्हते असे पैसे काढता, आणि जे तुम्ही पेरलं नव्हतं त्याची कापणी करता.’+ २२  तेव्हा तो माणूस त्या दासाला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांनी तुझा न्याय करतो. तुला माहीत होतं ना, की मी कठोर आहे, आणि मी जमा केले नव्हते असे पैसे काढतो आणि जे पेरलं नव्हतं त्याची कापणी करतो?+ २३  मग तू माझे पैसे* सावकाराकडे का ठेवले नाहीस? म्हणजे परत आल्यावर मला ते व्याजासकट मिळाले असते.’ २४  तेव्हा तिथे उभे असलेल्यांना तो म्हणाला, ‘याच्याकडून ते नाणं घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत त्याला द्या.’+ २५  पण ते त्याला म्हणाले, ‘प्रभू, त्याच्याजवळ तर आधीच दहा नाणी आहेत . . . . ’ २६  ‘मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.+ २७  आणि मी राजा होऊ नये असं ज्या माझ्या शत्रूंना वाटत होतं, त्यांना माझ्यापुढे हजर करा आणि माझ्यासमोर त्यांना मृत्युदंड द्या.’” २८  या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमकडे निघून गेला. २९  मग जेव्हा तो जैतुनांच्या डोंगराजवळच्या+ बेथफगे आणि बेथानी या गावांजवळ आला, तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना पुढे पाठवलं+ ३०  आणि म्हटलं: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणी बसलेलं नाही. त्याला सोडवून इकडे आणा. ३१  आणि जर कोणी तुम्हाला विचारलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’” ३२  तेव्हा ज्यांना पाठवण्यात आलं होतं, ते गेले आणि येशूने जसं सांगितलं होतं अगदी तसंच त्यांना दिसलं.+ ३३  ते गाढवाच्या पिल्लाला सोडत असताना त्याचे मालक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडताय?” ३४  ते म्हणाले: “प्रभूला याची गरज आहे.” ३५  मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला येशूजवळ आणलं आणि आपली बाहेरची वस्त्रं त्याच्यावर टाकून येशूला त्याच्यावर बसवलं.+ ३६  तो पुढे जात असताना लोक आपली बाहेरची वस्त्रं रस्त्यावर पसरवू लागले.+ ३७  मग तो जैतुनांच्या डोंगरावरून खाली जाणाऱ्‍या रस्त्याजवळ पोहोचताच शिष्यांचा पूर्ण समुदाय आनंदाने जयजयकार करू लागला. तसंच, जी महान कार्यं त्यांनी पाहिली होती, त्यांबद्दल ते मोठ्याने देवाची अशी स्तुती करू लागले: ३८  “यहोवाच्या* नावाने येणारा राजा आशीर्वादित असो! स्वर्गात शांती असो आणि स्वर्गात राहणाऱ्‍या देवाला गौरव मिळो!”+ ३९  पण गर्दीतून परूश्‍यांपैकी काही जण त्याला म्हणू लागले: “गुरुजी, तुमच्या शिष्यांना शांत राहायला सांगा.”+ ४०  पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगतो, जर हे शांत राहिले तर दगड ओरडतील.” ४१  मग शहराजवळ आल्यावर त्याने त्यावर नजर टाकली आणि तो रडू लागला.+ ४२  तो म्हणाला: “तू, हो तू जर आज शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, तर किती बरं झालं असतं! पण आता त्या तुझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.+ ४३  कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझे शत्रू तुझ्याभोवती टोकदार खांबांची भिंत उभारतील. ते तुला वेढतील आणि सगळ्या बाजूंनी तुला अडवतील.*+ ४४  ते तुला जमीनदोस्त करतील आणि तुझ्या मुलाबाळांना चिरडून टाकतील+ आणि तुझ्यात एकाही दगडावर दगड राहणार नाही.+ कारण तुझा न्याय* करायची वेळ तू ओळखली नाही.” ४५  मग तो मंदिरात आला आणि त्याने तिथल्या विक्रेत्यांना हाकलून लावलं.+ ४६  तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या मंदिराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलंय.+ पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”+ ४७  तो दररोज मंदिरात जाऊन शिकवत राहिला. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे नेते त्याला ठार मारायचा मार्ग शोधत होते.+ ४८  पण ते कसं करावं हे त्यांना सुचत नव्हतं. कारण सगळे लोक त्याचं ऐकायला सतत त्याच्या आजूबाजूला असायचे.+

तळटीपा

किंवा “खोटा आरोप लावून लुबाडलं.”
शब्दशः “मिना.” ग्रीक चलनानुसार एका मिनाची किंमत मजुराच्या सुमारे तीन महिन्यांच्या मजुरीइतकी होती. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “चांदी.”
किंवा “राज्य.”
शब्दशः “माझी चांदी.”
अति. क५ पाहा.
किंवा “तुझ्यावर अत्याचार करतील.”
शब्दशः “तुझी तपासणी.”