लूकने सांगितलेला संदेश २२:१-७१
-
याजक येशूला ठार मारायचा कट करतात (१-६)
-
शेवटच्या वल्हांडणाची तयारी (७-१३)
-
प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (१४-२०)
-
“माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर” (२१-२३)
-
श्रेष्ठ कोण याबद्दल वाद (२४-२७)
-
राज्यासाठी येशूने केलेला करार (२८-३०)
-
पेत्र नाकारेल याबद्दल भविष्यवाणी (३१-३४)
-
तयार असण्याची गरज; दोन तलवारी (३५-३८)
-
जैतुनांच्या डोंगरावर येशूची प्रार्थना (३९-४६)
-
येशूला अटक (४७-५३)
-
पेत्र येशूला नाकारतो (५४-६२)
-
येशूची थट्टा (६३-६५)
-
न्यायसभेपुढे चौकशी (६६-७१)
२२ आता बेखमीर भाकरींचा सण, ज्याला वल्हांडण+ म्हणतात तो जवळ आला होता.+
२ आणि मुख्य याजक आणि शास्त्री येशूला पकडून ठार मारायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असू शकेल, यावर विचार करत होते.+ कारण त्यांना लोकांची भीती होती.+
३ मग सैतानाने १२ शिष्यांपैकी एक असलेला यहूदा इस्कर्योत याच्या मनाचा ताबा घेतला.+
४ तेव्हा, आपण येशूला कसं पकडून देऊ याबद्दल बोलण्यासाठी यहूदा मुख्य याजक आणि मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला.+
५ त्यांना याचा फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी द्यायचं कबूल केलं.+
६ तेव्हा तो तयार झाला आणि लोकांची गर्दी नसेल अशा वेळी येशूला पकडून द्यायची एखादी चांगली संधी शोधू लागला.
७ मग बेखमीर भाकरींच्या सणाचा दिवस आला. या दिवशी वल्हांडणाचा पशू अर्पण केला जायचा.+
८ त्यामुळे येशूने पेत्र आणि योहान यांना असं म्हणून पाठवलं, की “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”+
९ ते त्याला म्हणाले: “आम्ही कुठे जाऊन तयारी करू?”
१० तो त्यांना म्हणाला: “शहरात गेल्यावर तुम्हाला पाण्याचं मडकं घेतलेला एक माणूस भेटेल. त्याच्यामागे जा आणि तो ज्या घरात जाईल तिथे जाऊन+
११ त्या घराच्या मालकाला असं म्हणा, ‘गुरुजींनी तुम्हाला विचारलंय: “मी आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करू शकेन, अशी खोली कुठे आहे?”’
१२ तेव्हा तो माणूस सामानसुमान लावून तयार केलेली माडीवरची एक मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.”
१३ तेव्हा शिष्य गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणेच सगळं घडलं. मग त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
१४ नंतर वेळ झाली, तेव्हा तो आपल्या १२ प्रेषितांसोबत मेजाभोवती जेवायला बसला.+
१५ मग तो त्यांना म्हणाला: “मी दुःख भोगण्याआधी, तुमच्यासोबत हे वल्हांडणाचं भोजन करावं अशी माझी फार इच्छा होती.
१६ कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात याची पूर्णता होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”
१७ मग त्याने प्याला घेतला आणि देवाला धन्यवाद देऊन तो म्हणाला, “हा घ्या आणि तुम्ही सगळे एकेक करून यातून प्या.
१८ कारण मी तुम्हाला सांगतो, की आजपासून देवाचं राज्य येईपर्यंत मी पुन्हा कधीही हा द्राक्षारस पिणार नाही.”
१९ तसंच, त्याने भाकर घेतली+ आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली आणि असं म्हणून त्यांना दिली: “ही भाकर माझ्या शरीराला सूचित करते.+ ते तुमच्यासाठी अर्पण केलं जाणार आहे.+ माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+
२० त्याच प्रकारे, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ तुमच्यासाठी ओतल्या जाणाऱ्या माझ्या रक्ताने हा करार स्थापित केला जाईल.+
२१ पण पाहा! माझा विश्वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवतोय.+
२२ कारण मनुष्याचा मुलगा तर ठरल्याप्रमाणे जाणारच आहे.+ पण, जो माणूस मनुष्याच्या मुलाचा विश्वासघात करून त्याला पकडून देईल त्याचा धिक्कार असो!”+
२३ हे ऐकून ते एकमेकांना विचारू लागले, की आपल्यापैकी खरंच कोण असं करेल.+
२४ त्याच वेळी, आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणाला मानलं जातं, यावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला.+
२५ पण येशू त्यांना म्हणाला: “विदेश्यांचे राजे त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्यांना जनसेवक* म्हटलं जातं.+
२६ पण तुमच्यामध्ये असं असू नये.+ उलट तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सगळ्यात लहान झालं पाहिजे.+ आणि पुढाकार घेणाऱ्याने इतरांची सेवा केली पाहिजे.
२७ कारण, श्रेष्ठ कोण असतो, जेवणारा की त्याची सेवा करणारा? जेवणाराच असतो ना? पण तुमच्यामध्ये मी सेवा करणाऱ्यासारखा आहे.+
२८ तरीसुद्धा, माझ्या परीक्षांमध्येही+ माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.+
२९ आणि जसा माझ्या पित्याने माझ्यासोबत एका राज्यासाठी करार केलाय, तसाच मीही तुमच्यासोबत एक करार करतो.+
३० तो असा, की माझ्या राज्यात तुम्ही माझ्यासोबत माझ्या मेजावर खाल-प्याल+ आणि राजासनांवर बसून+ इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+
३१ शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सगळ्यांना गव्हासारखं पाखडण्याची मागणी केली आहे.+
३२ पण तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे.+ आणि तू पश्चात्ताप करून परत आल्यावर आपल्या बांधवांचा विश्वास दृढ कर.”+
३३ मग तो त्याला म्हणाला: “प्रभू, मी तुझ्यासोबत तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार आहे.”+
३४ पण तो म्हणाला: “पेत्र, मी तुला सांगतो की जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस, तोपर्यंत आज कोंबडा आरवणारच नाही.”+
३५ तसंच तो त्यांना म्हणाला: “जेव्हा मी तुम्हाला पैशांचा बटवा, जेवणाची पिशवी किंवा जास्तीचे जोडे सोबत न घेताच पाठवलं होतं,+ तेव्हा तुम्हाला कशाचीही अडचण भासली नाही, भासली का?” ते म्हणाले: “नाही!”
३६ मग तो त्यांना म्हणाला: “पण आता ज्याच्याजवळ पैशांचा बटवा आहे त्याने तो सोबत घ्यावा, तसंच, जेवणाची पिशवीही घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकून ती विकत घ्यावी.
३७ कारण जे लिहून ठेवण्यात आलंय ते माझ्या बाबतीत पूर्ण होणं आवश्यक आहे. ते असं, की ‘त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं.’+ हे माझ्या बाबतीत आता पूर्ण होत आहे.”+
३८ मग ते म्हणाले: “प्रभू, पाहा! दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला: “पुरे.”
३९ तिथून निघाल्यावर तो नेहमीप्रमाणे जैतुनांच्या डोंगरावर गेला आणि शिष्यही त्याच्यामागे गेले.+
४० तिथे पोहोचल्यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”+
४१ मग त्यांच्यापासून काही अंतरावर* जाऊन तो गुडघे टेकून प्रार्थना करू लागला
४२ आणि म्हणाला: “बापा, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+
४३ तेव्हा, एक स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याने त्याला धीर दिला.+
४४ पण त्याच्या मनाला इतक्या यातना होत होत्या, की तो आणखीनच कळकळीने प्रार्थना करू लागला.+ तेव्हा त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा जमिनीवर पडू लागला.
४५ तो प्रार्थना करून उठला आणि शिष्यांजवळ गेला. पण खूप दुःखाने थकून गेल्यामुळे त्यांना झोप लागली होती.+
४६ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का झोपताय? उठा आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”+
४७ तो बोलत होता, इतक्यात एक मोठा जमाव तिथे आला. आणि १२ शिष्यांपैकी एक असलेला यहूदा त्यांच्यापुढे चालत होता. तो येशूचं चुंबन घेण्यासाठी त्याच्याजवळ आला.+
४८ पण येशू त्याला म्हणाला: “यहूदा, तू चुंबन घेऊन मनुष्याच्या मुलाला पकडून देतोस का?”
४९ त्याच्या सभोवती असलेल्यांनी जेव्हा काय घडणार आहे हे पाहिलं, तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, आम्ही त्यांच्यावर तलवारीने वार करू का?”
५० त्यांच्यापैकी एकाने तर तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्लाही केला आणि त्याचा उजवा कान कापून टाकला.+
५१ पण येशू त्यांना म्हणाला: “आता पुरे झालं.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरं केलं.
५२ मग आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या मुख्य याजकांना, मंदिराच्या अधिकाऱ्यांना आणि वडीलजनांना येशू म्हणाला: “एखाद्या चोराला पकडावं तसं तुम्ही तलवारी आणि काठ्या घेऊन मला पकडायला आला आहात का?+
५३ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ पण, ही तुमची आणि अंधाराची राज्य करायची वेळ आहे.”+
५४ मग ते त्याला अटक करून महायाजकाच्या घरी घेऊन गेले.+ पण पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे गेला.+
५५ ते अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवून बसले, तेव्हा पेत्रही त्यांच्यामध्ये बसला.+
५६ पण एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बघितलं, तेव्हा त्याला निरखून पाहत ती म्हणाली: “हा माणूसही त्याच्यासोबत होता.”
५७ पण तो ते नाकारून म्हणाला: “बाई, मी त्याला ओळखत नाही.”
५८ काही वेळाने आणखी एक जण त्याला पाहून म्हणाला: “तूसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहेस.” पण पेत्र म्हणाला: “नाही, अजिबात नाही.”+
५९ मग जवळजवळ एका तासाने आणखी एक माणूस पूर्ण खातरीने असं म्हणू लागला: “नक्कीच हा माणूसही त्याच्यासोबत होता, कारण हासुद्धा गालीलचा आहे!”
६० पण पेत्र म्हणाला: “अरे, तू काय बोलतोस मला कळत नाही.” आणि तेवढ्यात, त्याचं बोलणं संपण्याआधीच एक कोंबडा आरवला.
६१ तेव्हा प्रभूने वळून सरळ पेत्रकडे पाहिलं. आणि पेत्रला प्रभूचे हे शब्द आठवले: “आज कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+
६२ मग तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.
६३ नंतर, ज्यांनी येशूला धरून नेलं होतं, ते त्याची थट्टा करू लागले+ आणि त्याला मारू लागले.+
६४ मग त्याचा चेहरा झाकून ते त्याला म्हणाले, “भविष्यवाणी कर! आणि तुला कोणी मारलं ते सांग.”
६५ तसंच, त्यांनी त्याचा खूप अपमान आणि निंदा केली.
६६ मग दिवस उजाडल्यावर लोकांच्या वडीलजनांची, म्हणजे मुख्य याजक आणि शास्त्री यांची सभा भरली.+ त्यांनी त्याला न्यायसभेत* नेलं आणि ते म्हणाले:
६७ “तू ख्रिस्त असशील तर आम्हाला सांग.”+ पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही मुळीच विश्वास ठेवणार नाही.
६८ आणि मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही मला उत्तर देणार नाही.
६९ पण यापुढे मनुष्याचा मुलगा+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला असेल.”+
७० यावर ते सगळे म्हणाले: “तर मग, तू देवाचा मुलगा आहेस का?” तो त्यांना म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”
७१ तेव्हा ते म्हणाले: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज? कारण, आपण त्याच्या तोंडून स्वतः ऐकलंय.”+
तळटीपा
^ शब्दशः “परोपकारी.” ही एक सन्मानाची पदवी होती.
^ किंवा “दगड फेकला तर तो जितक्या दूर जाईल तितक्या अंतरावर.”
^ शब्दार्थसूची पाहा.