१ शमुवेल १७:१-५८
१७ पलिष्टी+ लोकांनी युद्धासाठी आपली सैन्यं जमा केली आणि ते यहूदातल्या सोखो+ इथे एकत्र जमले. त्यांनी सोखो आणि अजेका+ यांच्यामध्ये असलेल्या अफस-दम्मीम+ या ठिकाणी छावणी दिली.
२ शौल आणि इस्राएली माणसंही ‘एलाहच्या खोऱ्यात’+ एकत्र जमली. पलिष्टी लोकांचा सामना करण्यासाठी त्यांनी तिथे छावणी देऊन सैन्यरचना केली.
३ एका बाजूच्या डोंगरावर पलिष्टी सैनिक, तर दुसऱ्या बाजूच्या डोंगरावर इस्राएली सैनिक तैनात होते. आणि त्यांच्या मधे खोरं* होतं.
४ मग पलिष्टी लोकांच्या छावणीतून एक महान शूरवीर बाहेर आला; त्याचं नाव गल्याथ.+ तो गथचा+ राहणारा असून त्याची उंची सुमारे साडे नऊ फूट* इतकी होती.
५ त्याने डोक्यात तांब्याचा टोप घातला होता. आणि अंगात खवल्या-खवल्यासारखे पट्टे असलेलं चिलखत घातलं होतं. ते चिलखत+ तांब्याचं असून त्याचं वजन ५,००० शेकेल* इतकं होतं.
६ त्याच्या दोन्ही पायांवर तांब्याचं कवच होतं आणि पाठीवर तांब्याची बरची*+ लटकवलेली होती.
७ त्याच्या भाल्याचा लाकडी भाग, हातमागाच्या दांड्यासारखा+ असून भाल्याच्या लोखंडी पात्याचं वजन ६०० शेकेल* होतं. आणि त्याची ढाल घेऊन जाणारा त्याच्यापुढे चालत होता.
८ मग हा गल्याथ उभा राहून इस्राएली सैन्याला मोठ्याने म्हणाला:+ “तुम्ही इथे सैन्यरचना करून का आला आहात? मी सगळ्यात महान पलिष्टी योद्धा आहे, आणि तुम्ही तर शौलचे सेवक आहात. आता तुमच्यातून एकाला निवडा आणि त्याला माझ्याशी लढायला पाठवा.
९ जर तो माझ्याशी लढू शकला आणि मला ठार मारू शकला, तर आम्ही तुमचे गुलाम होऊ. पण जर मी त्याला हरवलं आणि त्याला मारून टाकलं, तर तुम्ही आमचे गुलाम व्हाल आणि आमची सेवा कराल.”
१० तो पलिष्टी पुढे म्हणाला: “आज मी इस्राएलच्या सैन्याला आव्हान देतो.*+ पाठवा तुमच्या माणसाला आणि होऊ द्या आमच्यात सामना!”
११ शौलने आणि सर्व इस्राएली माणसांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा ते अतिशय घाबरले.
१२ दावीद हा एफ्राथा,+ म्हणजे यहूदातल्या बेथलेहेम+ इथे राहणाऱ्या इशायचा+ मुलगा होता. इशायला आठ मुलं होती+ आणि शौलच्या शासनकाळापर्यंत तो वृद्ध झाला होता.
१३ इशायची पहिली तीन मुलं शौलबरोबर युद्धासाठी गेली होती.+ त्यांची नावं अशी होती: सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव अलीयाब,+ दुसऱ्याचं अबीनादाब+ आणि तिसऱ्याचं शाम्मा+ होतं.
१४ दावीद हा सर्वांपेक्षा लहान होता.+ आणि त्याचे सगळ्यात मोठे तीन भाऊ शौलसोबत गेले होते.
१५ दावीद हा बेथलेहेम इथे आपल्या वडिलांच्या मेंढरांची राखण करण्यासाठी शौलकडून ये-जा करायचा.+
१६ यादरम्यान, तो पलिष्टी रोज सकाळ-संध्याकाळ इस्राएली सैन्यासमोर येऊन उभा राहायचा आणि त्यांना आव्हान द्यायचा. असं तो ४० दिवसांपर्यंत करत राहिला.
१७ एकदा इशाय आपला मुलगा दावीद याला म्हणाला: “एवढा हा एफाभर* हुरडा आणि या दहा भाकरी घे, आणि पटकन आपल्या भावांसाठी छावणीत घेऊन जा.
१८ त्यांच्या प्रमुखासाठीही* पनीरचे हे दहा तुकडे घेऊन जा. तुझे भाऊ कसे आहेत याची विचारपूस कर आणि ते सुखरूप आहेत याची काहीतरी निशाणी त्यांच्याकडून घेऊन ये.”
१९ त्या वेळी ते पलिष्टी लोकांशी युद्ध करायला+ शौल आणि इतर इस्राएली माणसांसोबत ‘एलाहच्या खोऱ्यात’ होते.+
२० म्हणून मग दावीद सकाळीच उठला. त्याने आपली मेंढरं दुसऱ्याला राखायला दिली, आणि इशायने सांगितल्याप्रमाणे तो सामानाची बांधाबांध करून निघाला. तो छावणीजवळ आला त्या वेळी सैनिक युद्धाची घोषणा करत युद्धभूमीकडे चालले होते.
२१ मग इस्राएली सैन्य आणि पलिष्ट्यांचं सैन्य समोरासमोर तैनात झालं.
२२ दावीदने सामानाची देखरेख करणाऱ्या माणसाकडे आपल्या वस्तू दिल्या आणि तो धावतच युद्धभूमीकडे गेला. तिथे पोहोचल्यावर तो आपल्या भावांची विचारपूस करू लागला.+
२३ दावीद त्यांच्याशी बोलत होता इतक्यात गथमधला तो पलिष्टी, म्हणजे तो महान शूरवीर गल्याथ+ तिथे आला. तो पलिष्ट्यांच्या सैन्यातून पुढे आला आणि आधीसारखंच इस्राएली सैनिकांना आव्हान देऊ लागला.+ हे सगळं दावीदने ऐकलं.
२४ इस्राएलच्या माणसांनी गल्याथला पाहिलं तेव्हा ते घाबरले आणि त्यांनी त्याच्यासमोरून पळ काढला.+
२५ इस्राएलची माणसं म्हणत होती: “त्या माणसाला पाहिलंत? तो इस्राएलला आव्हान द्यायला* येत असतो.+ जो कोणी त्या माणसाला मारून टाकेल त्याला राजा भरपूर धनसंपत्ती देईल. आणि स्वतःच्या मुलीचं लग्नही त्याच्याशी लावून देईल!+ शिवाय, राजा इस्राएलमध्ये त्याच्या वडिलांच्या घराण्याला करातून आणि सेवेतून सूट देईल.”
२६ दावीदने जवळ उभ्या असलेल्या माणसांना विचारलं: “जो कोणी त्या पलिष्ट्याला मारून टाकेल आणि इस्राएलला बदनाम होण्यापासून वाचवेल त्या माणसाला काय इनाम मिळेल? जिवंत देवाच्या+ सैन्याला आव्हान देणारा* कोण हा बेसुंती* पलिष्टी?”
२७ मग लोकांनी त्याला तीच गोष्ट सांगितली: “त्याला ठार मारणाऱ्या माणसासाठी अमुक-अमुक केलं जाईल.”
२८ दावीदचा सगळ्यात मोठा भाऊ अलीयाब+ याने त्याला इतरांशी बोलताना ऐकलं, तेव्हा तो दावीदवर चिडला आणि त्याला म्हणाला: “इथे का आलास तू? जी थोडीफार मेंढरं आहेत ती कोणाच्या भरवशावर रानात सोडून आलास?+ तू किती घमेंडी आहेस आणि तुझ्या मनात किती दुष्टपणा भरलाय ते मला माहीत आहे. तू इथे फक्त लढाई बघायला आलास.”
२९ यावर दावीद म्हणाला: “आता मी काय केलं? मी तर फक्त एक प्रश्न विचारत होतो!”
३० मग तो तिथून निघून दुसऱ्या एकाकडे गेला आणि त्यालाही त्याने तोच प्रश्न विचारला.+ तेव्हा लोकांनी त्याला आधीसारखंच उत्तर दिलं.+
३१ दावीद जे काही बोलला ते लोकांनी ऐकलं आणि शौलला कळवलं. तेव्हा शौलने त्याला बोलावून घेतलं.
३२ दावीद शौलला म्हणाला: “त्या पलिष्ट्यामुळे कोणाचंही धैर्य खचू नये. तुमचा हा सेवक त्या पलिष्ट्याशी जाऊन लढेल.”+
३३ पण शौल त्याला म्हणाला: “तू त्या पलिष्ट्याशी लढू शकणार नाहीस. तू अजून लहान आहेस,+ आणि तो तर तरुणपणापासून कसलेला योद्धा आहे.”
३४ त्यावर दावीद शौलला म्हणाला: “तुमचा हा सेवक आपल्या वडिलांची मेंढरं चारायचा, तेव्हा एकदा एक सिंह+ कळपातलं मेंढरू घेऊन गेला; आणि आणखी एकदा एक अस्वल कळपातलं मेंढरू घेऊन गेलं.
३५ तेव्हा मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना मारलं आणि त्यांच्या तोंडातून मेंढरांना सोडवलं. ते माझ्या अंगावर आले तेव्हा मी त्यांचे जबडे* धरले, आणि त्यांना खाली पाडून मारून टाकलं.
३६ तुमच्या या सेवकाने सिंह आणि अस्वल या दोघांनाही ठार मारलं! आणि आता त्या बेसुंती पलिष्ट्याचीसुद्धा त्यांच्यासारखीच गत होईल. कारण त्याने जिवंत देवाच्या+ सैन्याला आव्हान दिलं आहे.”*
३७ दावीद पुढे म्हणाला: “ज्या यहोवाने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजांतून सोडवलं, तोच मला त्या पलिष्ट्याच्या हातूनही सोडवेल.”+ त्यावर शौल त्याला म्हणाला: “जा, यहोवा तुझ्यासोबत असो.”
३८ मग शौलने आपला युद्धाचा पोषाख दावीदला घातला. त्याने त्याच्या डोक्यावर तांब्याचा टोप ठेवला आणि त्याच्या अंगावर चिलखत चढवलं.
३९ मग दावीदने त्या पोषाखावर शौलची तलवार बांधली आणि चालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चालता येईना, कारण या सगळ्याचा त्याला सराव नव्हता. तो शौलला म्हणाला: “हे सगळं घालून मला जाता येणार नाही. कारण मला यांची सवय नाही.” मग दावीदने ते काढून टाकलं.
४० नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, आणि ओढ्यातून पाच गुळगुळीत दगड वेचून ते आपल्या मेंढपाळाच्या थैलीत ठेवले. मग एका हातात गोफण+ घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे जाऊ लागला.
४१ तो पलिष्टी, दावीदच्या जवळ येऊ लागला आणि त्याच्या पुढे-पुढे त्याची ढाल वाहणारा चालत होता.
४२ त्या पलिष्ट्याने दावीदला पाहिलं, तेव्हा त्याला तुच्छ लेखून तो त्याच्यावर हसू लागला. कारण, दावीद सुंदर दिसणारा केवळ एक कोवळा तरुण होता.+
४३ तो दावीदला म्हणाला: “माझ्याकडे काठी घेऊन यायला तू मला कुत्रा समजलास की काय?”+ असं म्हणून त्याने त्याच्या दैवतांच्या नावाने दावीदला शिव्याशाप दिले.
४४ तो पलिष्टी दावीदला म्हणाला: “चल ये पुढे. मी आकाशातल्या पक्ष्यांना आणि रानातल्या जनावरांना तुझं मांस खायला घालतो की नाही बघ.”
४५ तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला: “तू तलवार, भाला आणि बरची+ घेऊन माझ्याशी लढायला येत आहेस. पण मी सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाने तुझ्याकडे येतोय;+ तू ज्या इस्राएली सैन्याच्या देवाची निंदा केलीस*+ त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतोय.
४६ आजच यहोवा तुला माझ्या हाती देईल.+ मी तुला ठार मारून तुझं मुंडकं कापून टाकीन. आणि मी सगळ्या पलिष्टी सैनिकांची प्रेतं आजच आकाशातल्या पक्ष्यांना आणि पृथ्वीवरच्या जनावरांना खायला देईन. तेव्हा, इस्राएलचा देव हाच खरा देव आहे हे पृथ्वीवरच्या सर्व लोकांना समजेल.+
४७ आणि इथे जमलेल्या सगळ्यांना कळेल, की वाचवण्यासाठी यहोवाला तलवारीची किंवा भाल्याची गरज नसते.+ कारण हे युद्ध यहोवाचं आहे,+ आणि तो तुम्हा सर्वांना आमच्या हाती देईल.”+
४८ मग तो पलिष्टी दावीदशी लढायला पुढे येऊ लागला. तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी दावीद लगेच पलिष्ट्यांचं सैन्य होतं त्या दिशेने धावला.
४९ त्याने आपल्या थैलीतून एक दगड काढला आणि आपल्या गोफणीत घातला. मग गोफण गरगर फिरवून त्याने तो दगड पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला, की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो पलिष्टी जमिनीवर कोसळून पालथा पडला.+
५० अशा रितीने, फक्त एका गोफणीच्या आणि एका दगडाच्या जोरावर दावीदने त्या पलिष्ट्याला हरवलं. दावीदकडे तलवार नव्हती, पण तरीसुद्धा त्याने त्या पलिष्ट्याला मारून त्याचा अंत केला.+
५१ दावीद तसाच पुढे धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला. मग त्याने त्या पलिष्ट्याची तलवार+ म्यानातून काढली आणि त्याचं डोकं कापून टाकलं; म्हणजे तो मेला आहे याबद्दल कोणतीही शंका राहणार नाही. आपला शूर योद्धा मेला हे पाहून पलिष्टी सैनिकांनी पळ काढला.+
५२ हे पाहून इस्राएल आणि यहूदाची माणसं मोठ्याने जयघोष करू लागली. आणि त्यांनी खोऱ्यापासून+ पार एक्रोनच्या दरवाजांपर्यंत+ पलिष्ट्यांचा पाठलाग करून त्यांना मारलं. पलिष्टी लोकांचे मृतदेह शारईमकडे+ जाणाऱ्या रस्त्यापासून थेट गथ आणि एक्रोनपर्यंत पडले.
५३ पलिष्टी लोकांचा मोठ्या आवेशाने पाठलाग केल्यानंतर इस्राएली लोक परत आले आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.
५४ मग दावीदने त्या पलिष्ट्याचं डोकं उचलून यरुशलेममध्ये आणलं. पण त्याची शस्त्रं मात्र त्याने आपल्या तंबूत ठेवली.+
५५ शौलने जेव्हा दावीदला त्या पलिष्ट्याचा सामना करायला जाताना पाहिलं, तेव्हा त्याने आपला सेनापती अबनेर+ याला विचारलं: “अबनेर, हा कोणाचा मुलगा आहे?”+ त्यावर अबनेर म्हणाला: “महाराज! तुमच्या जिवाची शपथ, मला माहीत नाही.”
५६ तेव्हा राजा त्याला म्हणाला: “हा तरुण मुलगा कोणाचा आहे याची माहिती काढ.”
५७ दावीद त्या पलिष्ट्याला ठार मारून परत आला, तेव्हा अबनेर लगेच त्याला शौलकडे घेऊन गेला. त्या वेळी त्या पलिष्ट्याचं डोकं दावीदच्या हातातच होतं.+
५८ शौलने त्याला विचारलं: “बाळा, तू कोणाचा मुलगा आहेस?” त्यावर दावीद म्हणाला: “बेथलेहेमचे राहणारे+ तुमचे सेवक इशाय+ यांचा मी मुलगा आहे.”
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.
^ किंवा “सैन्याची निंदा करतो.”
^ किंवा “हजारांच्या प्रमुखासाठीही.”
^ किंवा “निंदा करायला.”
^ किंवा “निंदा करणारा.”
^ शब्दार्थसूचीत “सुंता” पाहा.
^ किंवा “केस.” शब्दशः “दाढी.”
^ किंवा “निंदा केली आहे.”
^ किंवा “आव्हान दिलंस.”