व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या दानाचा वापर

मूळ रहिवाशांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण

मूळ रहिवाशांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण

१ मे, २०२१

 लॅटिन अमेरिकेत लाखो-करोडो लोक राहतात. त्यात असेही लाखो लोक आहे जे तिथलेच मूळ रहिवासी आहेत. आणि त्यांची स्वतःची भाषा आणि संस्कृती आहे. या मूळ रहिवाशांमधले अनेक जण आपले भाऊबहीण आहेत आणि त्यांना त्यांच्या संस्कृतीचा आदर आहे. लोकांना बायबलमधून सत्य शिकून घ्यायला मदत करण्यासाठी हे भाऊबहीण लॅटिन अमेरिकेतल्या १३० पेक्षा जास्त मूळ भाषांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांचं भाषांतर आणि वितरण करतात. a पण काही जणांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. कारण त्यांनी यहोवाची सेवा करायची निवड केली आहे आणि त्यांच्या समाजात सामान्य असलेल्या, पण शास्त्राच्या विरोधात असलेल्या रितीरिवाजांमध्ये भाग घ्यायला नकार दिला आहे. मग त्यांना मदत करण्यासाठी तुमच्या दानांचा वापर कसा करण्यात आला आहे?

घरी परत जायला मदत करण्यासाठी

 मेक्सिकोमधल्या हॅलिस्को राज्यातल्या डोंगराळ भागात हुईकोल समाजाचे आपले भाऊबहीण राहतात. त्यांनी त्यांच्या विवेकाला न पटणाऱ्‍या धार्मिक रितीरिवाजांमध्ये भाग घ्यायला आदराने नकार दिला. b पण यामुळे त्यांच्या समाजातले काही लोक खूप भडकले. ४ डिसेंबर २०१७ ला एका हिंसक जमावाने साक्षीदारांच्या गटावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांवर हल्ला केला. त्यांनी त्यांना समाजातून हाकलून दिलं, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं आणि त्यांना अशी धमकी दिली की ते जर परत आले तर त्यांना मारून टाकण्यात येईल.

 आजूबाजूच्या गावांमधल्या साक्षीदारांनी या भाऊबहिणींना लगेच मदत केली. पण त्यांना घरी परत जाता यावं म्हणून आणखी काय करावं लागणार होतं? अगस्टिन नावाचे भाऊ म्हणतात: “वकील करायला आमच्याकडे तितके पैसे नव्हते आणि कायदेशीर गोष्टींच्या बाबतीत कोणाकडे सल्ला मागायचा हेसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं.”

 आपल्या भाऊबहिणींचं उपासनेचं स्वातंत्र्य धोक्यात होतं. त्यामुळे मध्य अमेरिकेच्या शाखेने लगेच पावलं उचलली. सगळ्यात आधी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्‍यांना या गुन्ह्यांचा तपास करायला सांगितला. नंतर त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या संयोजक समितीची परवानगी घेतली. यामुळे त्यांना जागतिक मुख्यालयाच्या कायदा विभागासोबत काम करता आलं आणि हुईकोल भाऊबहिणींच्या वतीने खटला उभा करता आला. हा खटला नंतर मेक्सिकोच्या सर्वात मोठ्या न्यायालयात, म्हणजे राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयात गेला.

 वकिलांच्या आंतरराष्ट्रीय टिमने एक स्पष्ट दावा मांडला. त्यात त्यांनी असं सांगितलं की इतर जणांनी जसं मूळ रहिवाशांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे, तसंच या समाजातल्या लोकांनीही त्यांच्या समाजातल्या सर्व लोकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे. कारण मानवी हक्क सगळ्यांसाठी सारखेच असतात; मग लोक कुठेही राहत असले तरी.

 ८ जुलै, २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने एकमताने यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने असा आदेश दिला की ज्यांना त्यांच्या समाजातून हाकलून लावण्यात आलंय, त्यांना परत येऊ द्यावं. आधी उल्लेख केलेले अगस्टिन आणि इतर लोक यासाठी खूप आभारी आहेत. अगस्टिन म्हणतात: “भावांनी आमच्यासाठी जे केलंय त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि खरंच आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला मदत केली नसती तर आम्ही काहीच करू शकलो नसतो.”

“एवढ्याशा लोकांसाठी एवढं सगळं”

 एक्वाडॉरमध्ये सॅन वॉन दे इलुमन नावाच्या गावात ओटावालो खोरं आहे. तिथे बरेच मूळ रहिवासी राहतात. त्यांनासुद्धा अशाच प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला. २०१४ मध्ये राज्य सभागृह बांधण्यासाठी लागणारे सर्व परवाने मिळवल्यानंतर त्यांनी बांधकाम सुरू केलं होतं. पण एक पाळक १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावाला घेऊन तिथे गेला आणि त्याने जबरदस्तीने बांधकाम थांबवलं. नंतर त्या समाजाने यहोवाच्या साक्षीदारांना उपासनेसाठी एकत्र न येण्याचा आदेश दिला.

 एक्वाडॉर शाखेचा आणि जागतिक मुख्यालयाचा कायदा विभाग एकत्र मिळून मंडळीच्या बाजूने उभा राहिला. भावांनी हे प्रकरण न्यायालयात नेलं. यामुळे समाजातल्या लोकांनी भाऊबहिणींचा विरोध करायचं सोडून दिलं. इतकंच नाही तर त्यांनी त्यांना राज्य सभागृहाचं काम पूर्ण करू दिलं आणि सभा पुन्हा सुरू करू दिल्या. पण भविष्यात आपल्या भावांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं म्हणून आपल्या प्रतिनिधींनी मोठ्या न्यायालयांमध्ये एक महत्त्वाचा दावा मांडला: मूळ रहिवाशांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचा आदर केला पाहिजे की नाही?

 १६ जुलै, २०२० मध्ये एक्वाडॉरच्या सगळ्यात मोठ्या न्यायालयाने म्हणजे संविधान न्यायालयाने हा खटला हाती घेतला. एक्वाडॉरमधल्या वकील असलेल्या भावांनी मंडळीचं प्रतिनिधित्व केलं. यासोबतच, आंतरराष्ट्रीय वकील म्हणून काम करणारे चार अनुभवी भाऊसुद्धा न्यायालयाशी बोलले. कोव्हिड-१९ च्या प्रतिबंधांमुळे ते वेगवेगळ्या देशांमधून व्हिडिओ कॉलद्वारे बोलले. एखाद्या न्यायालयाने, जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्‍या कायदा टिमला अशा पद्धतीने आपला दावा मांडू द्यायची परवानगी देण्याची ही पहिलीच वेळ होती. c या टिमने आंतरराष्ट्रीय कायदा अधिकाऱ्‍यांना एका गोष्टीची सर्वांना पुन्हा आठवण करून द्यायला सांगितली. ती म्हणजे, मूळ रहिवाशांनी फक्‍त त्या समाजातले असल्यामुळे त्यांच्या मानवी हक्कांचा त्याग करू नये.

आंतरराष्ट्रीय वकिलांच्या टिमने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या भावांच्या हक्कांचं संरक्षण केलं

 ओटावालो खोऱ्‍यातले आपले भाऊ संविधान न्यायालयाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तोपर्यंत त्यांना दिल्या जाणाऱ्‍या मदतीची ते खूप कदर करतात. इल्यूमन क्विचूआ मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे सिझर नावाचे भाऊ म्हणतात: “फक्‍त यहोवाच त्याच्या संघटनेचा वापर करून एवढ्याशा लोकांसाठी एवढं सगळं करू शकतो.”

 या खटल्यात जेवढेपण वकील आहेत ते सगळे यहोवाचे साक्षीदार आहेत आणि त्यांच्याकडे असलेली वकिलीची माहिती ते आनंदाने कोणताही मोबदला न घेता या कामासाठी वापरतात. पण तरी हे खटले सुरू करायला, त्यांची तयारी करायला आणि न्यायालयात दावे मांडायला वेळ आणि पैसा लागतो. वकील असलेल्या आपल्या भावांनी आणि इतर भावांनी कायद्याविषयीचे दावे तयार करायला ३८० पेक्षा जास्त तास खर्च केलेत आणि मेक्सिकोच्या सुनावणीसाठी दस्तऐवजांचं भाषांतर करायला आणखी २४० तास खर्च केलेत. जगभरातल्या जवळपास ४० वकिलांनी एक्वाडॉरच्या खटल्यासाठी शेकडो तास खर्च केलेत. पण या सगळ्या कामांसाठी लागणारा खर्च कसा भागवला जातो? तुमच्या दानातून. जगभरातल्या कामासाठी दिलं जाणारं हे दान, donate.pr2711.com या वेबसाईटवर दिलेल्या पद्धतींचा वापर करून दिलं जातं. खरंच, तुम्ही उदारतेने जे दान देता त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो!

a यहोवाचे साक्षीदार लॅटिन अमेरिकेत बोलल्या जाणाऱ्‍या इतर बऱ्‍याच भाषांमध्ये आणि फक्‍त त्याच भागांतल्या साइन लँग्वेजमध्ये असलेल्या प्रकाशनांचंही भाषांतर करतात.

b हुईकोल लोक विक्सारायटारी म्हणूनसुद्धा ओळखले जातात आणि त्यांच्या भाषेला सहसा विक्सारायका म्हणतात.

c आपली जागतिक संघटना या खटल्याचा भाग नसली, तरी न्यायाधीशांनी भावांना अमिकस क्युरी (न्यायमित्र) म्हणून न्यायालयात हजर राहायची परवानगी दिली.