तुमच्या दानाचा वापर
समृद्धीतून भागवलेली गरज
१ ऑक्टोबर, २०२०
यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा जास्त देशांमध्ये धार्मिक आणि सामाजिक काम करतात. पण यातल्या फक्त ३५ देशांमधूनच, त्या त्या देशातला खर्च भागवला येईल इतकं दान येतं. पण मग बाकीच्या कमी साधनं असलेल्या देशांमधला खर्च कसा भागवला जातो?
जगभरातल्या साक्षीदारांना यहोवाची उपासना करण्यासाठी आणि आनंदाचा संदेश सांगण्यासाठी कशाची गरज आहे यावर यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ विचार करतं. आलेल्या दानाचा योग्य वापर करता यावा म्हणून चांगली योजना केली जाते. जर एखाद्या शाखेकडे गरजेपेक्षा जास्त दान येत असेल, तर त्यांच्याकडचं काही दान गरीब देशांमध्ये पाठवलं जातं. असं करून सुरुवातीच्या ख्रिश्चनांसारखं ‘समानतेचं’ तत्त्वं लागू केलं जातं. (२ करिंथकर ८:१४) सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी त्यांच्या समृद्धीचा वापर करून, इतर ख्रिश्चनांची गरज भागवली.
ज्या भाऊबहिणींना इतर शाखांकडून दान मिळतं त्यांना याबद्दल कसं वाटतं? तंझानियामधलं उदाहरण पाहा. त्या देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना १५० रुपयांपेक्षा कमी पैशांत दिवसाचा खर्च भागवावा लागतो. बाहेरून आलेल्या दानाचा वापर करून तिथल्या मफिंगा मंडळीच्या राज्य सभागृहाची दुरुस्ती करण्यात आली. या मंडळीने असं लिहिलं: “दुरुस्तीनंतर आमच्या सभेच्या उपस्थितीत आणखी वाढ झाली आहे! यहोवाच्या संघटनेने आणि जगभरातल्या भाऊबहिणींनी दाखवलेल्या उदारतेसाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. यामुळेच आम्हाला एका सुंदर ठिकाणी आनंदाने यहोवाची उपासना करता येते.”
कोविड-१९ महामारीमुळे, श्रीलंकेतल्या आपल्या काही भाऊबहिणींना अन्न टंचाईचा सामना करावा लागला आहे. इमारा फरनांडो आणि त्यांचा मुलगा एनोश त्यांपैकीच आहेत. असं असलं तरी, इतर देशांकडून आलेल्या दानांमुळे त्यांना मदत पुरवता आली. त्यांनी एका पत्रात असं म्हटलं: “या कठीण काळात भाऊबहिणींनी आमच्यावर प्रेम असल्याचं दाखवलं यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आम्ही यहोवाच्या कुटुंबाचा भाग आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही यहोवाला हीच प्रार्थना करतो की या शेवटच्या काळात त्याने भाऊबहिणींना मदत करत राहावी.”
आपले भाऊबहीण कुठेही राहत असले, तरी ते त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना द्यायला तयार असतात. आधी उल्लेख केलेल्या एनोशनेसुद्धा गरज असलेल्या कुटुंबांना मदत करता यावी म्हणून स्वतःसाठी एक छोटी दानपेटी बनवली. मेक्सिकोत राहणाऱ्या ग्वाडालुपे अलवारेझ नावाच्या बहिणीनेसुद्धा अशीच उदार वृत्ती दाखवली. ती ज्या राज्यात राहते तिथल्या लोकांना फार कमी पगार मिळतो किंवा वेळेवर पगार मिळत नाही. तरीसुद्धा ती जमेल तितकं दान देते. तिने लिहिलं: “यहोवाने दाखवलेल्या चांगुलपणासाठी आणि त्याच्या एकनिष्ठ प्रेमासाठी मी त्याची खूप आभारी आहे. मला माहीत आहे की इतर भाऊबहिणींच्या दानासोबत माझ्या दानाचाही वापर करून गरज असलेल्या भाऊबहिणींना मदत केली जाईल.”
ज्या शाखा गरज असलेल्या ठिकाणी दान पाठवतात त्यांना असं केल्याचा खूप आनंद होतो. ब्राझीलमधल्या शाखा समितीत काम करणारे अँथनी करवालो म्हणतात: “बऱ्याच वर्षांपर्यंत आम्हाला इतर देशांच्या दानाची गरज होती. आम्हाला मिळालेल्या मदतीमुळे बरीच वाढ झाली. आता आमची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आम्हाला इतरांना मदत करायचा बहुमान मिळालाय. ब्राझीलमधले भाऊ जगभरातलं प्रचाराचं काम लक्षात घेतात आणि आपण त्या कामाला कसा हातभार लावू शकतो याचा विचार करतात.”
मग गरज असलेल्या आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार काय करू शकतात? विदेशी शाखांना थेट पैसे पाठवण्याऐवजी, ते मंडळीत “जगभरातल्या कामासाठी दान” अशी पाटी असलेल्या दानपेटीत दान टाकू शकतात. किंवा ते donate.pr2711.com वर जाऊन दान देऊ शकतात. या सगळ्या दानांची आम्ही मनापासून कदर करतो.